सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत विजेता
वृत्तसंस्था / कोलंबो
17 वर्षांखालील वयोगटातील येथे खेळविण्यात आलेल्या 2025 च्या पुरूषांच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकाविले. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पेनल्टी किकवर 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला.भारतीय कनिष्ठ पुरूषांच्या फुटबॉल संघाने ही स्पर्धा आतापर्यंत सातवेळा जिंकली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील शनिवारचा हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी किकचा अवलंब केला. पेनल्टी कीकमध्ये भारताने बांगलादेशचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
अंतिम सामना सुरू झाल्यानंतर चौथ्याच मिनिटाला भारताचे खाते डी. गंगटेने उघडले. मात्र भारताला ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. 25 व्या मोहम्मद माणिकने शानदार गोल करुन बांगलादेशला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला सात मिनिटे बाकी असताना अझलन शहाने भारताचा दुसरा गोल केला. भारत हा सामना निर्धारीत वेळेत जिंकणार असे वाटत असताना 97 व्या मिनिटाला बांगलादेशला एहसान हबीब रिदुआनने पेनल्टी कीकवर शानदार गोल केला. त्यामुळे निर्धारीत वेळेत दोन्ही संघ पुन्हा 2-2 असे बरोबरीत राहिले.
पेनल्टी किकमध्ये भारताने चारही फटक्यांवर आपले गोल केले. तर बांगलादेशचा एक फटका हुकला तर त्यांचा दुसरा फटका भारतीय गोलरक्षक बारुआने थोपविल्याने बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघातील डी. गंगटेने या स्पर्धेत एकूण 4 गोल नोंदविले. मात्र पाकच्या मोहम्मद अब्दुल्लाहने या स्पर्धेत म्हणजे पाच गोल नोंदविले असल्याने गंगटे दुसऱ्या स्थानावर राहीला. भारतीय फुटबॉल संघाने ही स्पर्धा विक्रमी सातव्यांदा जिंकली आहे.