पीडी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला ऐतिहासिक जेतेपद
वृत्तसंस्था/ कोलंबो
भारताच्या दिव्यांग (पीडी) क्रिकेट संघाने संस्मरणीय माईलस्टोन गाठताना येथे सुरू असलेल्या पीडी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील रोमांचक ठरलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 79 धावांनी पराभव करून जेतेपद पटकावले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर निर्धारित 20 षटकांत 4 बाद 197 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर इंग्लंड पीडी संघाला केवळ 118 धावांत गुंडाळून जेतेपद पटकावला. दिव्यांगासाठी असलेल्या भारतीय क्रिकेट कौन्सिलने (डीसीसीआय) आपल्या एक्स हँडलवर यांची माहिती दिली असून ‘हा एक ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. सांघिक कामगिरी, दृढनिश्चय व अप्रतिम कौशल्य दाखवत भारतीय संघाने हे यश मिळविल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय पीडी संघाचा कर्णधार विक्रांत केनीने प्रारंभापासूनच आघाडीवर राहत नेतृत्व केले. हा आपल्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत प्लेऑफपासून जेतेपदापर्यंतचा प्रवास आपल्या संघातील गुणवत्तेची खोली आणि लढाऊ वृत्ती दर्शविते. या ऐतिहासिक यशात प्रत्येक खेळाडूने योगदान दिलेले आहे. ही ट्रॉफी फक्त आम्ही जिंकली नसून ज्या दिव्यांगांनी देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले, त्यांनी तो जिंकला आहे, असेही तो म्हणाला. या अंतिम लढतीत योगेंद्र भदोरियाने शानदार फलंदाजी करीत 40 चेंडूत 73 धावा तडकावल्या. त्यात 4 चौकार, 5 षटकारांचा समावेश होता. गोलंदाजीच्या विभागात भारताच्या राधिका प्रसादने 19 धावांत 4 बळी मिळवित मोलाची भूमिका बजावली. कर्णधार विक्रांतनेही अष्टपैलू प्रदर्शन करीत 3 षटकांत 15 धावांत 2 बळी टिपले तर रवींद्र सांतेने 24 धावांत 2 बळी मिळविले. मुख्य प्रशिक्षक रोहित जालानी यांनीही संघाच्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक केले.