आशियाई स्नूकरमध्ये भारताला सुवर्णपदक
वृत्तसंस्था/ कोलंबो
शनिवारी येथे झालेल्या एसीबीएस आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने मलेशियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अंतिम सामन्यात भारताने बलाढ्या मलेशियाचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. भारताच्या पंकज अडवाणी आणि ब्रिजेश दमाणी यांची कामगिरी दर्जेदार झाली.
भारतीय स्नूकर संघाने इराणमध्ये या स्पर्धेचे सुवर्णपदक दोन वर्षांपूर्वी मिळविले होते. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच वेळेला सुवर्णपदके पटकाविली आहेत. कोलंबोमधील या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत हाँगकाँग-1 चा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. भारतीय संघातील आदित्य मेहताला पराभव पत्करावा लागला असल्याने भारताने दोन सामने गमविले होते. त्यानंतर दमानीने हाँगकाँगच्या चेयूचा पराभव करत आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये नेले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मलेशियाने पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
अंतिम फेरीतील लढतीत पहिल्या सामन्यात मलेशियाच्या लिआँगने भारताच्या ब्रिजेश दमानीचा पराभव केला. त्यानंतर पंकज अडवाणीने मलेशियाच्या लिआँगचा 66-25 असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात अडवाणी आणि दमानी यांनी मलेशियाच्या चूआन व कॉक यांचा 76-33 असा पराभव करत या स्पर्धेतील सुवर्णपदक पुन्हा आपल्या संघाकडे राखले.