मिश्र एअर पिस्तूलमध्ये भारताला सुवर्णपदक
भारतीय नेमबाजांची 11 पदकांची कमाई
वृत्तसंस्था/टोकिया
25 व्या डेफलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ यांनी 10 मी एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले, तर कुशाग्र सिंग राजावतने 50 मी. रायफल प्रोन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेत एकूण 11 पदके जिंकली. देशवाल आणि प्रांजली यांनी चिनी तैपेईच्या या-जू काओ आणि मिंग-जुई हसू यांचा 16-6 असा पराभव करून अव्वल स्थान पटकावले. दिवसाच्या दुसऱ्या स्पर्धेत, राजावतने 224.3 च्या अंतिम गुणांसह कांस्यपदक जिंकले. युक्रेनच्या दिमित्री पेट्रेन्कोने 251.0 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि डेफवर्ल्ड आणि ऑलिंपिक रेकॉर्ड मोडला.
जर्मनीच्या कॉलिन मुलरने 245.4 गुणांसह रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच देशवाल आणि प्रांजलीने आपले स्थान कायम ठेवले आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमनाची संधी दिली नाही. या जोडीने यापूर्वी पात्रता स्पर्धेत स्वताच्या डेफवर्ल्ड आणि ऑलिंपिक विक्रमाची बरोबरी केली होती. तसेच अनुया, प्रांजलीने वैयक्तिक 10 मी एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केला. अभिनवने 287-12 गुण (97,95,95) आणि प्रांजलीने 282-8 गुण (95,94,93) गुणांसह त्यांनी 569-20 गुणांचा एकत्रित स्कोअर केला आणि पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले. सोमवारी दोन्ही नेमबाजांनी वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदके जिंकली होती.