आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्ण
4 बाय 400 मी मिश्र रिलेत भारतीय खेळाडूंची कामगिरी : दुसऱ्या दिवशी एका सुवर्णासह 4 रौप्य व एका कांस्यपदक
वृत्तसंस्था/ गोमी (दक्षिण कोरिया)
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एका सुवर्णासह 4 रौप्य व 1 कांस्य अशा एकूण पाच पदकांची कमाई केली. बुधवारी भारताने चीनला नमवताना 4 बाय 400 मिश्र रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. संतोष कुमार, रुपल, विशाल आणि सुभा यांनी 3 मिनिटे 18.12 सेकंदात ही कामगिरी करत सुवर्ण जिंकले. याशिवाय, तेजस्विन शंकर, पूजा व रुपल चौधरी यांनी रौप्य, तर यूनूस शाह याने कांस्यपदक जिंकले. या कामगिरीमुळे भारत पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10,000 मीटर स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.
बुधवारी झालेल्या 4 बाय 400 मीटर मिश्र रिले शर्यतीत भारतीय खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवताना चीनला चीतपट केले. 4 बाय 400 मीटर मिश्र रिले शर्यतीत संतोष कुमार, रुपल, विशाल आणि सुभा यांनी अविश्वसनीय कामगिरी केली. त्यांनी 3 मिनिटे 18.12 सेकंदात हे अंतर पूर्ण करून सुवर्ण नावावर केले. चीनच्या संघाला 3 मिनिटे 20.52 सेकंदासह रौप्य, तर श्रीलंकेच्या संघाला 3 मिनिटे 21.95 सेकंदासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या सुवर्णपदक विजेत्या संघात सुभा वेंकटेश ही एकमेव सदस्य होती, जिचा 2023 च्या सुवर्णपदक विजेत्या संघातही सहभाग होता. प्रारंभी, संतोष कुमारने शानदार सुरुवात करुन देतानना सुरुवातीपासून आघाडी घेतली. यानंतर रुपल, विशाल व सुभा यांनी सातत्य राखत अखेरीस यशाला गवसणी घातली.
400 मी शर्यतीत रुपल चौधरीला रौप्य
भारताची अव्वल अॅथलिट व मेरठची रहिवासी असलेल्या रुपल चौधरीने 400 मी शर्यतीत 52.68 सेकंदाची कामगिरी नोंदवत रौप्यपदक पटकावले. अवघ्या 0.51 सेकंदाच्या फरकाने रुपलचे सुवर्णपदक हुकले. जपानच्या ननाको मात्सुमोटोने 52.17 सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. तर उझबेकिस्तानच्या हुकमोव्हाने 52.79 सेकंदासह कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत भारताच्या विथ्या रामराजला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
याशिवाय, महिलांच्या 1500 मी शर्यतीत 4 मिनिटे 10.83 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. भारताची लिली दास या प्रकारात चौथ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले. चीनच्या ली चुनहुईने सुवर्ण तर जपानच्या तोमाकाने कांस्यपदक पटकावले.
तेजस्विन शंकर, प्रविण चित्रावेलला रौप्य
डेकॅथलॉन या आव्हानात्मक क्रीडा प्रकारात तेजस्विन शंकरने 7618 गुणांसह रौप्यपदक नावावर केले. चीनच्या फेई झिआंग 7634 गुणांसह सुवर्ण, तर जपनाचा केईसुके ओकुदा 7602 गुणांसह कांस्यपदक जिंकून गेला. तेजस्विन शंकर याने डेकॅथलॉन प्रकारात रौप्य पदक मिळवत आपली अष्टपैलूता सिद्ध केली. याशिवाय, प्रविण चित्रावेल याने तिहेरी उडी प्रकारात रौप्य पदक पटकावले. प्रविणनन शानदार कामगिरी करताना यश खेचून आणले.
युनूस शाहला कांस्य
पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत यूनूस शाहने 3:43.03 सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक नावावर केले. जपानच्या काझुटो इजावाने 3:42.56 सेकंदाच्या वेळेसह सुवर्ण, तर दक्षिण कोरियाच्या जियूंग लीने 3:42.79 सेकंदासह रौप्यपदक जिंकले. 24 वर्षीय यूनूसचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक आहे.