भारत जिंकलाही अन् हरलाही
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने मायदेशी सहकारी एचएस प्रणॉयवर केली मात : पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागचा धक्कादायक पराभव
वृत्तसंस्था /पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी नेमबाज स्वप्नील कुसाळेने भारताला तिसरे पदक मिळवून दिले. यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सत्रात बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने मायदेशी सहकारी एचएस प्रणॉयला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दुसरीकडे पुरुष दुहेरीत पदकाची प्रबळ दावेदार असणाऱ्या सात्विक व चिराग शेट्टी जोडीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. गुरुवारी बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत युवा लक्ष्य सेन व एचएस प्रणॉय उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आमनेसामने होते. या सामन्यात लक्ष्यने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखताना प्रणॉयला 21-12, 21-6 असा पराभवाचा धक्का दिला.
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या लक्ष्यने सामन्यात प्रणॉयला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्याने पहिला गेम 21-12 असा सहज जिंकला. यानंतर दुसरा गेमही त्याने एकतर्फी जिंकत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, पुरुष एकेरीत बॅडमिंटनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा लक्ष्य तिसरा भारतीय आहे. याआधी 2012 मध्ये पारुपल्ली कश्यपने तर 2016 मध्ये किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता, उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईच्या चेन चाऊ तिएनशी होईल.
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग स्पर्धेबाहेर
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत पदकाची प्रबळ दावेदारी असलेल्या भारताच्या सात्विक व चिराग शेट्टी जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गुरुवारी झालेल्या सामन्यात मलेशियाच्या चिया व सोह जोडीने 21-13, 14-21, 16-21 असे पराभूत केले. 64 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळ साकारला पण विजय मिळवण्यात मात्र त्यांना अपयश आले. या सामन्यात सात्विक व चिरागने सामना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, हे विशेष. आता, भारताची पदकाची आशा पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन यांच्यावर असणार आहे.