For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताला एकाच दिवशी 9 सुवर्णपदके

06:12 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारताला एकाच दिवशी 9 सुवर्णपदके
Advertisement

निखत, जस्मिन, मीनाक्षी, प्रीती, हितेश, सचिन विजेते

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा

स्टार बॉक्सर निखत झरीनच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला पथकाने येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चषक फायनल्स स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करीत 7 सुवर्णपदके पटकावली तर हितेश गुलिया व सचिन सिवाच यांनीही सुवर्णपदके पटकावली. भारताने प्रत्येक वजन गटात किमान एक पदक पटकावत एकूण 22 पदकांची कमाई केली. त्यात 9 सुवर्ण, 6 रौप्य व 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.

Advertisement

एकूण 15 स्पर्धक रिंगणात उतरले होते. त्यात जस्मिन लंबोरिया, मीनाक्षी हुडा, प्रीती पवार, परवीन हुडा, अरुंधती चौधरी, नुपूर शेअरन यांनीही सुवर्णपदके मिळविली. जादुमणी सिंग, अभिनाश जमवाल, पवन बर्तवाल, अंकुश फांगल, नरेंदर बेरवाल, पूजा राणी यांनी रौप्य, नीरज फोगट, सवीती, सुमित कुंडू, जुगनू, नवीन यांना कांस्यपदके मिळाली.

या स्पर्धेत जगातील अव्वल खेळाडूंनी भाग घेतला नव्हता तर कझाक व उझ्बेक या पॉवरहाऊस असलेल्या देशांनी तिय्यम दर्जाचे खेळाडू पाठविले होते. तरीही परवीन, प्रीती, अरुंधती यांना या व्यासपीठाचा पुनरागमनासाठी चांगला उपयोग करून घेता आला.

जस्मिनने 57 किलो गटाच्या अंतिम लढतीत पॅरिस ऑलिम्पिक पदकविजेत्या वु शिह यी हिला 4-1 असा पराभवाचा धक्का देत स्पर्धेतील सर्वात मोठा व सनसनाटी विजय मिळविला. 50 किलो गटाच्या अंतिम लढतीत दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनने चिनी तैपेईच्या गुओ यि झुआनवर एकतर्फी मात करून सुवर्ण पटकावले. दुखापतीतून बरे झाल्यानंतर तिचे पुनरागमन यशस्वी ठरले. 60 किलो गटात परवीनने जपानच्या आयाका तागुचीवर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला तर अरुंधतीने 70 किलो गटाच्या अंतिम लढतीत उझ्बेकच्या अझिझा झोकिरोव्हावर 5-0 अशी एकतर्फी मात केली. मीनाक्षी हुडाने 48 किलो गटाच्या लढतीत निर्दोष खेळ करीत आशियाई चॅम्पियन फरझोना फोझिलोव्हाचा 5-0 असा पराभव केला.

पुरुष विभागात सचिन सिवाचनेही निर्दोष प्रदर्शन करीत किर्गीझस्तानच्या मुनारबेक उलू सीइटबेकचा 5-0 असा पराभव केला. हितेश गुलियाने पिछाडीवर पडल्यानंतरही कझाकच्या नुरबेक मुरसालवर रोमांचक लढतीत 3-2 असा विजय मिळविला. त्याने दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत जोरदार प्रदर्शन करीत बाजी मारली.

Advertisement
Tags :

.