आशियाई युवा स्पर्धेत भारताला 47 पदके
वृत्तसंस्था / बहरीन
येथे सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी केली असून आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 47 पदकांची लयलुट केली आहे.
भारतीय स्पर्धकांनी या स्पर्धेत मुष्टीयुद्ध या क्रीडा प्रकारात 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळविले. बिच रेसलिंग या क्रीडा प्रकारात भारताने 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळविली. भारतीय पथकाची या स्पर्धेतील ही ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागेल. विशेषत: मुष्टीयुद्ध या क्रीडा प्रकारात भारताने सर्वाधिक पदके मिळविली आहेत. खुशी चंद (46 किलो), अहना शर्मा (50 किलो), चंद्रिका पुजारी (54 किलो), अनिष्का (80 किलो वरील) यांनी सुवर्णपदके मिळविली. खुशीने चीनच्या जीनझीयुचा 4-1 अशा गुणांनी तर अहना शर्माने कोरियाच्या हेयांगचा 4-1, चंद्रिका पुजारीने उझबेकच्या कुमरिनोसोचा तसेच अनिष्काने प्रतिस्पर्ध्याचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. 66 किलो गटात हरनूर कौरने रौप्य पदक, एम. लेंचेनबा सिंगने रौप्यपदक तर अनंत देशमुखने कांस्यपदक घेतले. बिच रेसलिंग प्रकारात भारताच्या सानी फुलमाली आणि अंजली यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या 60 व 55 किलो वजन गटात सुवर्णपदके तसेच अर्जुन रुहील, सुजय तानपूरे आणि रविंद्र यांनी रौप्य पदके मिळविली.