नेमबाजीमध्ये भारताला 16 पदके
वृत्तसंस्था / टोकियो
डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारतीय नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी करताना 16 पदकांची कमाई केली. तर मंगळवारी या क्रीडा प्रकारातील झालेल्या पुरूषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताच्या चेतन सपकाळला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारतीय नेमबाजांनी एकूण 39 पैकी 16 पदके काबीज केली. हा क्रीडा प्रकार 10 दिवस चालला होता. भारताच्या नेमबाजांनी 7 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्यपदके मिळविली. या स्पर्धेत भारताची महिला नेमबाज महित संधू सर्वात यशस्वी ठरली. तिने 2 सुवर्ण आणि 2 रौप्य अशी एकूण 4 पदके मिळविली. अभिनव जैस्वाल आणि प्रांजली धुमाळ यांनी अनुक्रमे दोन सुवर्ण आणि 1 रौप्य पदक घेतले. धनुष श्रीकांतने 10 मी. एअर रायफल वैयक्तिक नेमबाजी प्रकारात तसेच मिश्र सांघिक प्रकारात दोन सुवर्णपदके घेतली. मोहम्मद मुर्तजाने 1 रौप्य आणि 1 कांस्य तर कोमल वाघमारेने 2 कांस्यपदके मिळविली. महिलांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत अनुया प्रसादने सुवर्णपदक तर शौर्या सैनीने 50 मी. थ्री पोझिशन प्रकारात रौप्य, कुशाग्र सिंग राजवतने 50 मी. रायफल प्रोनी प्रकारात कांस्यपदक मिळविले. ब्राझीलमध्ये यापूर्वी झालेल्या डेफ ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी नेमबाजी प्रकारात 3 सुवर्ण आणि 2 कांस्य अशी एकूण 5 पदके मिळविली होती.