आशियाई युवा स्पर्धेत भारताला 15 पदके
वृत्तसंस्था / मनामा (बहरीन)
येथे सुरू असलेल्या 2025 च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारताने आणखी पाच पदकांची कमाई केली. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात भारताच्या ओसीन एडविना जेसन आणि वीर भादू यांनी चमकदार कामगिरी केली.
भारताच्या ओसीनने मुलींच्या थाळीफेक प्रकारात 43.38 मी.ची नोंद करत रौप्य पदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात चीनच्या वेंगने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविताना 55.38 मी. ची नोंद केली. चीन तैपेईच्या यून शीने 43.00 मी.ची नोंद करत कांस्यपदक मिळविले. मुलींच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या एडविना जेसनने 55.43 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात संयुक्त अरब अमिरातच्या आयेशा तारीकने 54.26 सेकंदांचा अवधी घेत सुवर्ण तर चीन तैपेईच्या वूने 56.60 सेकंदांचा अवधी घेत कांस्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात सहभागी झालेली भारताची आणखी एक धावपटू तनूला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 15 पदकांची कमाई केली आहे.
मुलांच्या 5000 मी. चालण्याच्या शर्यतीमध्ये भारताच्या पलाश मंडलने कांस्यपदक पटकाविताना 24 मिनिटे 48.92 सेकंदांचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात चीनच्या झेंगने सुवर्ण तर चीनच्या लूने रौप्य पदक पटकाविले. मुलांच्या उंचउडी या क्रीडा प्रकारात भारताच्या झुबीन गोहेनने कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात चीन तैपेईच्या हुआंगने सुवर्ण तर चीनच्या झाओ झीनने रौप्य पदक मिळविले. भारताच्या वीर भादूने मिश्र मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात थायलंडच्या बारीसेरीला मागे टाकत रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेतील अद्याप सहा दिवस बाकी असून भारतीय पथक आणखी काही पदके मिळविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.