फझा पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताला 14 पदके
वृत्तसंस्था/ दुबई
येथे झालेल्या सहाव्या फझा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय बॅडमिंनटपटूंनी एका सुवर्णासह एकूण 14 पदकांची कमाई केली.
शिवरंजन सोलामलाय, सुदर्शन सरवनकुमार मुथुसामी यांनी भारतासाठी एकमेव सुवर्ण मिळविले. या जोडीला पुरुष दुहेरीच्या एसएच 6 गटाच्या अंतिम फेरीचा सामना न खेळताच जेतेपद मिळाले अग्रमानांकित हाँगकाँगची जोडी चु मान काइ व वाँग चुन यिम यांनी अंतिम लढतीतून माघार घेतल्याने भारतीय जोडीला सुवर्ण मिळाले. अनुभवी शटलर उमेश विक्रम कुमारला दोन प्रकारात रौप्य मिळाले. त्याने स्टँडिंग लोअर एसएल 3 एकेरी व पुरुष दुहेरीत भाग घेतला होता. हार्दिक मक्कर व रुतिक रघुपती यांना अंतिम फेरीत अग्रमानांकित मलेशियाच्या चियाह लाईक होयू व मुहम्मद फरीझ अन्वर यांच्याकडून पुरुष दुहेरीत पराभूत व्हावे लागले. त्यांनी स्टँडिंग अप्पर एसयू 5 प्रकारात भाग घेतला होता.
टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन कृष्णा नागर याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य लढतीत त्याला ब्राझीलच्या व्हिटर तावारेसने हरविले. त्याने हे पदक देशाचे अथक परिश्रम घेत संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना अर्पण केले. देशाचे संरक्षण करण्यासाठी ते अथक रात्रंदिवस कठोर परिश्रम घेत आहेत. त्यांचे हे धैर्यच प्रेरणादायी ठरते, अशा भावना त्याने व्यक्त केल्या.