भारताचा आयर्लंडवर विजय
वृत्तसंस्था/ रूरकेला
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान भारताने आयर्लंडचा 4-0 गोल फरकाने पराभव करत मायदेशातील मोहिमेची विजयी सांगता केली.
या सामन्यात भारतातर्फे निलकांता शर्माने 14 व्या मिनिटाला, आकाशदीप सिंगने 15 व्या मिनिटाला, गुरर्जंत सिंगने 38 व्या मिनिटाला तर जुगराज सिंगने 60 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या लढतीमध्ये भारताने मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी घेतली होती. निलकांता आणि जुगराज यांनी पेनल्टी कॉर्नरवर तर आकाशदीप सिंग आणि गुरर्जंत सिंग यांनी मैदानी गोल केले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत 8 सामन्यातून 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने 5 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत. नेदरलँडस्चा संघ 26 गुणांसह पहिल्या तर ऑस्ट्रेलिया 20 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता या स्पर्धेत हरमनप्रित सिंगच्या नेतृत्त्वाखाली भारतीय हॉकी संघ येत्या मे-जून दरम्यान होणाऱ्या युरोपियन टप्प्यामध्ये आपला सहभाग दर्शविल.