भारत योग्यवेळी योग्य पाऊल उचलणार
अमेरिकेच्या निर्बंधांप्रकरणी जयशंकर यांची टिप्पणी : रशियन कच्चे तेल खरेदीचा मुद्दा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
रशियन कच्च्या तेलाच्या प्रमुख खरेदीदारांवर 500 टक्के आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या योजनेवर भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावर भारत योग्य पाऊल उचलणार आहे. स्थिती स्पष्ट झाल्यावरच भारत याप्रकरणी ठोस भूमिका घेणार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर 500 टक्के शुल्क लादण्याची तरतूद असलेले विधेयक मांडणाऱ्या अमेरिकेच्या खासदारासमोर भारताच्या ऊर्जा सुरक्षेवरून जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.
भारताच्या हितात असणाऱ्या किंवा त्यावर प्रभाव पाडू शकणाऱ्या घटनाक्रमावर आम्ही अत्यंत बारकाईने नजर ठेवून असतो, असे जयशंकर यांनी वॉशिंग्टन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. भारत सरकार व भारतीय दूतावास अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांच्या संपर्कात असल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे. ग्राहम यांनीच हे कठोर विधेयक मांडले आहे. विधेयक मांडताना ग्राहम यांनी भारत व चीन हे देश मिळून पुतीन यांच्याकडून 70 टक्के कच्चे तेल खरेदी करत असल्याचा आरोप केला होता. आम्ही आमच्या ऊर्जासुरक्षेशी संबंधित चिंता अन् हितसंबंधांना ग्राहम यांच्यासमोर मांडले आहे. हे विधेयक आता त्या किती पुढे नेतात हे पहावे लागेल. जेव्हा वेळ येईल, तेव्हा आम्ही पूल पार करू, असे म्हणत जयशंकर यांनी परिस्थितीनुसार पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
व्यापार कराराची पार्श्वभूमी
याचदरम्यान भारत आणि अमेरिका एका व्यापार कराराला अंतिम रुप देण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहेत. या कराराचा उद्देश ट्रम्प यांच्याकडून एप्रिलमध्ये घोषित 26 टक्के रेसिप्रोकल (जशास तसे) शुल्कापासून वाचणे आहे. हा करार झाल्यास भारतीय निर्यातदारांना अमेरिकेत मोठा दिलासा मिळू शकतो.
रशियाकडून कच्च्या तेलाची वाढती खरेदी
भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सातत्याने वाढत आहे. मे 2025 मध्ये हे प्रमाण 1.96 दशलक्ष बॅरल्स प्रतिदिनापर्यंत पोहाचले आहे. हे प्रमाण मागील 10 महिन्यांमध्ये सर्वाधिक आहे. आता भारताने पश्चिम आशियाई देशांपेक्षा अधिक कच्चे तेल रशियाकडून खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते, त्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. अशास्थितीत रशियाने भारत आणि चीन यासारख्या देशांना सवलतीच्या दरात कच्चे तेल विकण्यास सुरुवात केली. यामुळे भारतालाही यामुळे मोठा लाभ झाला. भारत सद्यकाळात स्वत:च्या ऊर्जा आवश्यकतांचा 40-45 टक्के हिस्सा कच्च्या तेलाने पूर्ण करतो, यात रशियाची हिस्सेदारी वेगाने वाढली आहे.
ट्रम्प यांचे समर्थन ठरले आव्हान
या विधेयकाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन मिळाल्याने चिंता निर्माण झाली आहे. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 500 टक्के आयातशुल्क लादण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताचा समावेश आहे. या विधेयकाच्या माध्यमातून अमेरिका रशियावर युक्रेन युद्धासंबंधी चर्चा करण्यासाठी दबाव आणू पाहत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. हे विधेयक संमत झाल्यास भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात प्रभावित होऊ शकते. 500 टक्के आयातशुल्क भारतीय व्यापारासाठी एक मोठा झटका ठरू शकते.