अमेरिकेचे एफ-35 खरेदी करणार नाही भारत
देशात निर्मितीच्या अटीवर कराराची इच्छा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे एफ-35 लढाऊ विमान खरेदी करण्यात रुची नसल्याचे भारताने अमेरिकेच्या प्रशासनाला कळविले असल्याचे समजते. मोदी सरकार नजीकच्या भविष्यात अमेरिकेसोबत कुठलाही मोठा संरक्षण करार करू इच्छित नाही. तर केंद्र सरकार संरक्षण उपकरणांच्या निर्मितीतील भागीदारीकरता अधिक आग्रही आहे. म्हणजेच भारत तंत्रज्ञान हस्तांतरण आणि देशात निर्मितीच्या अटीवर संरक्षण करार करू इच्छित आहे. चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हाइट हाउस दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ-35 लढाऊ विमानांच्या विक्रीचा प्रस्ताव दिला होता. यानंतर एप्रिल महिन्यात भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनीही भारताला एफ-35 पुरविण्याची ऑफर दिली होती.
एफ-35 हे अमेरिकेचे 5 व्या पिढीचे लढाऊ विमान आहे. एफ-35 हे लढाऊ विमान अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीने विकसित केले आहे. 2015 पासून अमेरिकेच्या वायुदलात हे विमान सामील आहे. पेंटागॉनच्या इतिहासातील हे सर्वात महाग लढाऊ विमान आहे. अमेरिका एका एफ-35 लढाऊ विमानावर सरासरी 82.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 715 कोटी रुपये) खर्च करत आहे.
रशियाच्या लढाऊ विमानासाठी निम्मा खर्च
रशियाने भारताला स्वत:च्या पाचव्या पिढीचे लढाऊ विमान एसयू-57 उपलब्ध करण्याची ऑफर दिली आहे. एफ-35 च्या तुलनेत याची किंमत जवळपास निम्मी आहे. एका एसयू-57 लढाऊ विमानाची किंमत सुमारे 325 कोटी रुपये आहे. याची देखभाल देखील एफ-35 च्या तुलनेत स्वस्त असणार आहे. भारताने अमेरिकेकडून एफ-35 खरेदी केल्यास सेवेपासून सुट्या भागांपर्यंत अमेरिकेच्या कंपनीवर निर्भर रहावे लागणार आहे. तर एसयू-57 बाबत ही अडचण उद्भवणार नाही. रशियाने हे लढाऊ विमान भारतातच निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच याच्याशी संबंधित सर्व सेवाही भारतात उपलब्ध असतील.
रशिया विश्वासार्ह संरक्षण पुरवठादार
अनेक दशकांपासून रशिया भारताचा मुख्य संरक्षण पुरवठादार राहिला आहे. लढाऊ विमान आणि पाणबुड्यांपासून क्षेपणास्त्र प्रणाली तसेच हेलिकॉप्टर्सपर्यंत रशिया भारताला संरक्षण सामग्री पुरवित आला आहे.
भारताचा प्रकल्प
भारत स्वत:च्या 5व्या पिढीच्या लढाऊ विमानावर काम करत असून ते 2-3 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. एप्रिल 2024 मध्ये सुरक्षाविषयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने पाचव्या पिढीच्या स्वदेशी लढाऊ विमानाच्या डिझाइन आणि विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. एएमसीए विमान भारतीय वायुदलाच्या अन्य लढाऊ विमानांपेक्षा मोठे असणार आहे. यात शत्रूच्या रडारपासून वाचण्यासाठी अत्याधुनिक स्टील्थ तंत्रज्ञान असेल.