अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकणार नाही!
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना विश्वास : पंतप्रधान मोदींचे कौतुक
वृत्तसंस्था/ मॉस्को
अमेरिकन व्यापार शुल्काच्या दबावाला न जुमानता रशियासोबत तेल व्यापार सुरू ठेवण्याच्या भारताच्या निर्णयाचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जोरदार समर्थन केले. वालदाई पॉलिसी फोरम क्लबच्या बैठकीत बोलताना पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे भारत कधीही झुकणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच भारतीय पंतप्रधान पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना अमेरिकेवर तीव्र शब्दात टीका केली. ही बैठक दक्षिण रशियातील काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील सोची येथे झाली. या परिषदेत भारतासह 140 देशांचे सुरक्षा आणि भूराजकीय तज्ञ उपस्थित होते.
सोची येथे झालेल्या वालदाई पॉलिसी फोरमला संबोधित करताना गुरुवारी पुतिन यांनी पंतप्रधान मोदी कधीही भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा निर्णय घेणार नाहीत असे म्हटले आहे. पुतिन यांनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांचे संतुलित आणि शहाणे नेते म्हणून वर्णन केले. या निर्णयामुळे झालेल्या नुकसानातून रशिया भारताला सावरण्यास मदत करेल असा दावाही पुतिन यांनी केला. पुतिन डिसेंबरच्या सुरुवातीला भारताला भेट देणार असून त्यांनी या भेटीला उपस्थित राहण्याची उत्सुकता व्यक्त केली.
भारतासोबतचा व्यापार असमतोल दूर करण्याचा सल्ला
पुतिन यांनी मोदींना मित्र असे संबोधत ते त्यांच्याशी आत्मविश्वासाने वाटाघाटी करू शकतात. डिसेंबरच्या सुरुवातीला रशियाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या भारत भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या सरकारला भारताच्या मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे निर्माण झालेल्या व्यापार असमतोलाला तोंड देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देशही दिले. जर भारताची इच्छा असेल तर भारत व्यापार असंतुलन दुरुस्त करण्यासाठी रशियाकडून अधिक कृषी उत्पादने आणि औषधे खरेदी करू शकतो, असेही स्पष्ट केले.
अमेरिकेवर अचूक ‘नेम’
पुतिन यांनी आपल्या भाषणात अमेरिकेवरही टीका केली. भारतासारख्या देशांना रशियन कच्चे तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आणला जात असताना अमेरिका स्वत: युरेनियमसाठी रशियावर अवलंबून आहे. सध्याच्या दोलायमान वातावरणात रशिया अमेरिकेला युरेनियमचा पुरवठा करत राहील. अमेरिका आपल्याकडून ते खरेदी करते कारण त्याचा त्यांना फायदा होतो, असेही पुतिन यांनी निदर्शनास आणून दिले. रशियाच्या व्यापार भागीदारांवर उच्च शुल्क लादले गेले तर त्याचा जागतिक ऊर्जेच्या किमतींवर परिणाम होईल. किंमती वाढल्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हला उच्च व्याजदर राखण्यास भाग पाडले जाईल. या निर्णयामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावेल. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर त्याचे 9 ते 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल, असा इशारा पुतिन यांनी दिला.