भारत मोठ्या प्रमाणात करकपात करेल !
डोनाल्ड ट्रंप यांची अपेक्षा, आज रेसिप्रोकल करप्रणालीची घोषणा व्हाईट हाऊसमधून केली जाणार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेकडून आज साऱ्या जगावर प्रतिद्वंद्वी करप्रणाली लागू केली जाण्याची घोषणा होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ही घोषणा स्वत: व्हाईट हाऊसमधून करणार आहेत. जो देश अमेरिकेच्या मालावर जितका कर लावेल तितकाच कर अमेरिका त्या देशाच्या मालावर लावणार आहे. ट्रंप यांच्या या धोरणाचे परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसे आणि किती प्रमाणात होतील, हे काही काळानंतरच स्पष्ट होणार आहे. तथापि, ट्रंप यांच्या या धोरणाचे अनेक देशांवर गंभीर परिणाम संभवू शकतात, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
अमेरिकेच्या ज्या वस्तू भारतात निर्यात होतात, त्या वस्तूंवरील आयात करात भारत लवकरच मोठी कपात करेल, अशी अपेक्षा ट्रंप यांनी मंगळवारी व्यक्त केली. केवळ भारतच नव्हे, तर जगातील इतर अनेक देशांनीही अमेरिकेच्या मालावर करकपात करण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकेने या संदर्भात कठोर धोरण स्वीकारल्यानेच या देशांना आता त्यांच्या धोरणात परिवर्तन करावे लागत आहे. आजवर अमेरिकेच्या उदार धोरणांचा लाभ जगातील सर्व देशांनी उठविला. आता त्यांना तसा लाभ दिला जाणार नाही. अमेरिका आपली हानी सोसून इतरांची उस्तवारी करणार नाही, अशी स्पष्टोक्ती डोनाल्ड ट्रंप यांनी केली.
अमेरिकेसाठी ‘लिबरेशन डे’
2 एप्रिल हा दिवस अमेरिकेसाठी जणू स्वातंत्र्यदिनच आहे. कारण अमेरिका या दिवसापासून जगाशी जशास तसे या न्यायाने वागणार आहे. जगातील प्रत्येकाशी आमचे संबंध आता ‘समानते‘च्या तत्वानुसार राहतील. आमच्या वस्तू किंवा सेवांवर जो कर लावला जाईल, तेव्हढाच कर आम्ही त्या देशाच्या मालावर लावणार आहोत. जगाला आता अमेरिकेचे सामर्थ्य समजून येईल. प्रथम वाल्गना करणाऱ्या अनेक देशांना आता वस्तुस्थितीची जाणीव झाली असून ते आमच्या वस्तूंवर कर कमी करण्याच्या धोरणाचा स्वीकार करीत आहेत. त्यामुळे आमचे धोरण यशस्वी होणार असून अमेरिका आणखी बलवान होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारतासह अनेक देशांचा उल्लेख
अमेरिकेच्या कृषी आणि दुग्धोत्पादनावर भारतात 100 टक्के कर लावला जातो. अमेरिकेच्या तांदळावर जपानमध्ये 700 टक्के कर आहे. इतर देशही अमेरिकेच्या खाद्यपदार्थांवर अशाच प्रकारे 200 टक्के किंवा 300 टक्के कर लावतात. अमेरिकेच्या लोण्यावर कॅनडात 300 टक्के कर आकारला जातो. आता अमेरिकाही या देशांसंबंधी जशास तसे या धोरणानुसार वागेल, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लीव्हीट यांनी दिली. आता प्रतिद्वंद्वी कराच्या युगाचा प्रारंभ होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष क्रांतीकारक पाऊल उचलणार आहेत.
भारतावर परिणाम काय होणार...
अमेरिकेच्या प्रतिद्वंद्वी कर धोरणाचा भारतावर नेमका काय, कसा आणि किती परिणाम होईल, याविषयी अनेक मते व्यक्त केली जात आहेत. भारताचा अमेरिकेशी व्यापार तसा फार मोठा नाही. अमेरिका भारताकडून ज्या वस्तू आयात करतो, त्या वस्तू जगात कोठेही विकल्या जाऊ शकतात. त्यामुळे अमेरिकेने मोठ्या प्रमाणात कर लावल्यास भारत अन्यत्र या वस्तूंसाठी बाजारपेठ शोधू शकतो. त्यामुळे भारतावर या धोरणाचा फारसा परिणाम होणार नाही, असे काही तज्ञांचे मत आहे. तर अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतीय मालाची निर्यात अमेरिकेला करणे महाग होईल, असाही सूर काही तज्ञांनी लावला आहे. या धोरणामुळे अमेरिका जगात एकटी पडेल, अशीही मते व्यक्त केली जात आहेत.
खरा परिणाम चीन, कॅनडावर
ट्रंप यांच्या या धोरणाचा खरा विपरीत परिणाम चीन, कॅनडा आणि युरोपियन महासंघावर होणार आहे. त्यांचा अमेरिकेशी व्यापार प्रचंड प्रमाणात आहे. कॅनडा, चीन, व्हिएतनाम, जपान इत्यादी देशांनी आजवर अमेरिकेच्या वस्तूंवर मोठा कर लावून लाभ उठविलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अधिक परिणाम संभवतो. या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी या देशांनी चालविली आहे. या देशांनी एकमेकांना सहकार्य करुन अमेरिकेला आव्हान देण्यासाठी सज्जता केली आहे. मात्र, अमेरिकेशी पूर्णपणे संघर्षाचा पवित्रा घेऊनही चालणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे काही देशांनी करांच्या संदर्भात नमते घेण्यासही प्रारंभ केला आहे.
अमेरिकेच्या धोरणाचा आज प्रारंभ
ड सर्व देशांवर अमेरिकेचा 2 एप्रिलपासून प्रतिद्वंद्वी कर लागू होणार
ड व्हाईट हाऊसमधून डोनाल्ड ट्रंप स्वत: या धोरणाची घोषणा करणार
ड या धोरणाचा अनेक देशांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता
ड कॅनडा, जपान, युरोपियन देश सध्या तरी आहेत सावध पवित्र्यात