भारताला अमेरिकेचे म्हणणे मानावेच लागेल
पीटर नवारो यांनी पुन्हा दिली धमकी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या भूमिकेदरम्यान पुन्हा एकदा अमेरिकेच्या अधिकाऱ्याने भारताला धमकी दिली आहे. व्हाइट हाउसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताला अमेरिकेचे म्हणणे मान्य करावेच लागेल असे म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे म्हणणे मान्य न केल्यास भारतासाठी चांगले ठरणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली आहे. भारताला कुठल्या न कुठल्या क्षणी अमेरिकेसोबत व्यापार चर्चांवर सहमत व्हावेच लागेल. जर असे घडले नाही तर भारत रशिया आणि चीनसोबत उभा दिसून येईल आणि हे भारतासाठी ‘चांगले’ नसेल. भारताला ‘टॅरिफ किंग’ म्हटल्याने भारत सरकार दुखावले गेल्याचा दावा नवारो यांनी केला आहे.
ब्रिक्स समूहातील कुठलाही देश अमेरिकेला स्वत:ची उत्पादने विकल्याशिवाय टिकूच शकत नाही. हे देश अमेरिकेला निर्यात करत स्वत:च्या चुकीच्या व्यापार धोरणांद्वारे ‘वॅम्पायर’प्रमाणे आमच्या नसांमधील रक्त शोषून घेत असल्याची आक्षेपार्ह टिप्पणी नवारो यांनी केली. भारत दशकांपासून चीनविरोधात युद्ध लढत आहे, पाकिस्तानला चीननेच अणुबॉम्ब पुरविला होता. आता हिंदी महासागरात चिनी ध्वज असलेली जहाजं फिरत आहेत, ही स्थिती कशी सांभाळणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच पहावे. अमेरिकेच्या विरोधात जगातील कुठल्याही मोठ्या देशाप्रकरणी भारतच सर्वाधिक आयातशुल्क आकारतो हे सत्य आहे. आम्हाला ही स्थिती बदलावी लागेल असे नवारो यांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी भारत त्याच्याकडून कच्चे तेल खरेदी करत नव्हता. परंतु युद्ध सुरू झाल्यावर भारताने नफेखोरीची भूमिका घेतली. रशियन रिफायनर भारताच्या भूमीवर जात नफा मिळवत आहेत, तर अमेरिकन करदात्यांना या संघर्षासाठी अधिक पैसे पाठवावे लागत असल्याचा दावा नवारो यांनी केला.