भारताची आज पुन्हा नेदरलँड्सशी गाठ
सामन्यात उशिरा गोल स्वीकारण्याच्या सवयीवर करावी लागेल मात
प्रतिनिधी/ अॅम्स्टलव्हीन
भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना आज सोमवारी येथे नेदरलँड्सशी होणार असून त्यांना जर नेदरलँड्सविऊद्ध पुनरागमन करायचे असेल आणि एफआयएच प्रो लीगमध्ये अव्वल स्थानाच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर त्यांना उशिरा गोल स्वीकारण्याची सवय मोडून काढावी लागेल.
शनिवारी नेदरलँड्सविऊद्ध झालेल्या 1-2 अशा पराभवानंतर भारत प्रो लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरला आहे. नेदरलँड्स नऊ सामन्यांत 17 गुणांसह आघाडीवर आहे, त्यानंतर इंग्लंड (आठ सामन्यांत 16 गुण), बेल्जियम (आठ सामन्यांत 16 गुण) आणि भारत (नऊ सामन्यांत 15 गुण) यांचा क्रमांक लागतो. प्रो लीगचा युरोपियन टप्पा भारतासाठी अधिक महत्त्वाचा आहे. अव्वल स्थानांत राहिल्यास भारत बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढील वर्षी होण्राया विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल. जर त्यात ते अपयशी ठरले, तर या वर्षी 5 ते 14 सप्टेंबरदरम्यान बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या आशिया कपमध्ये भारताला आणखी एक संधी मिळेल.
शनिवारी भारताने एक गोलची आघाडी गमावली आणि ऑलिंपिक विजेत्या नेदरलँड्सविऊद्ध शेवटी पराभव पत्करला. पहिल्या सत्राच्या सुऊवातीलाच भारतीय संघाने आशादायक कामगिरी केली. त्यावेळी कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. तथापि, डच संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अखेर थिज व्हॅन डॅमच्या दोन गोलमुळे विजयी झेप घेतली, ज्यामध्ये 58 व्या मिनिटाला केलेल्या विजयी गोलाचा समावेश होता. नेदरलँड्सच्या आक्रमक हल्ल्यांविऊद्ध भारतीय बचावफळीने चांगली कामगिरी केली होती, परंतु दोन मिनिटे शिल्लक असताना भंग झालेली एकाग्रता आणि मॅन-मार्किंगमधील काही त्रुटी त्यांना महागात पडल्या.
असे असले तरी, भारतीय आघाडीपटूंना खंबीर राहावे लागेल आणि अधिक संधी निर्माण कराव्या लागतील. ही बाब शनिवारी कमी प्रमाणात आढळली. तसेच, मिडफिल्ड आणि फॉरवर्ड लाइनमध्ये अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे. हे गोल करण्याच्या संधी निर्माण करणारे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे.
‘आम्ही पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली, पण तिसरा सत्र तितकासा चांगला नव्हता. चौथ्या सत्रात आम्ही पुन्हा चांगली कामगिरी केली आणि चेंडू ताब्यात घेत राहिलो, पण आम्हाला गोलवर एकही फटका हाणता आला नाही. अशा प्रकारे पराभव होणे दुर्दैवी आहे. कारण मला वाटले होते की, आम्ही बरोबरीत सामना सोडेवू शकतो. आम्हाला विशेषत: नेदरलँड्ससारख्या संघाविऊद्ध शक्य तितका स्वत:वर जोर द्यावा लागेल, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी शनिवारी झालेल्या सामन्यानंतर सांगितले.
पुढील वर्षीच्या विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी भारत उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आणि आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे लक्ष्य ठेवेल. भारत या वर्षाच्या सुऊवातीला भुवनेश्वरमध्ये प्रो लीगचा घरघुती टप्पा खेळला होता. त्यात त्यांनी आठ सामन्यांमध्ये पाच विजयांसह 15 गुण मिळवले होते.