भारताचा सामना आज आयर्लंडशी
वृत्तसंस्था/ ब्लूमफॉन्टेन
आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकातील आज गुरुवारी येथे होणार असलेल्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारताचा आयर्लंडशी सामना होणार असून यावेळी भारताचे युवा तुर्क फलंदाजी करताना अधिक सक्रिय दृष्टिकोन बाळगतील अशी अपेक्षा आहे. भारतचा सलामीचा सामना अपेक्षापेक्षा सोपा राहून बांगलादेशला त्यांनी 84 धावांनी पराभूत केले. पुढील आठवड्यात सुपर सिक्स टप्पा सुरू होणार असून त्यात कठीण प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध वेगळ्या पद्धतीने खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळेल.
आयर्लंडने सुऊवातीच्या सामन्यात कमकुवत अमेरिकेला नमविले, तर बांगलादेशविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. भारताच्या दृष्टीने प्रतिस्पर्ध्याशी लढण्यापेक्षा आधुनिक दृष्टिकोन लक्षात ठेवून स्वत:चा स्तर वाढवणे , 50 षटकांचा सामना खेळणे हे अधिक महत्त्वाचे असेल. कर्णधार उदय सहारनने 64 धावा केलेल्या असून त्याचा आणि सर्वाधिक धावा जमविलेल्या आदर्श सिंगचा (76) स्ट्राइक-रेट अनुक्रमे 79 आणि 68 इतका आहे, जो आधुनिक काळाचा विचार करता किंचित कमी आहे.
भारताकडे दोन उत्कृष्ट परंतु अत्यंत भिन्न डावखुरे फिरकीपटू सौम्यकुमार पांडे आणि मुशीर खान यांच्या रुपाने असून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांना त्यांच्याविषयी काळजी करावी लागणार नाही. पहिल्या सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेल्या सौम्यला खांद्याचा जास्त त्रास होणार नाही अशी संघ व्यवस्थापनाला अपेक्षा असेल. त्या त्रासामुळे त्याला पहिल्या आणि दुसऱ्या स्पेलदरम्यान तात्पुरता ब्रेक घ्यावा लागला. संथ असलेल्या ब्लोमफॉन्टेन खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना ‘स्ट्राइक’ चांगल्या प्रकारे फिरवावा लागेल आणि पॉवरप्लेच्या षटकांत अधिक प्रभावी फटकेबाजी देखील करावी लागेल.
पुढच्या वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार असून त्यादृष्टीने सहारन, आदर्श आणि प्रियांशू मोलिया यासारख्या खेळाडूंना लक्ष वेधून घेण्याकरिता आपल्या खेळाचा स्तर उंचवावा लागेल. पहिल्या सामन्यात फक्त सचिन धसच ते करू शकलेला असून त्याच्या खेळीमुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला. याशिवाय सर्वांच्या नजरा प्रियांशूवरही असतील. कारण बडोद्यातर्फे त्याने दोन रणजी शतके झळकावलेली असून अशी कामगिरी केलेला तो संघातील एकमेव खेळाडू आहे. मात्र पहिल्या सामन्यातील त्याची बचावात्मक मानसिकता धक्कादायक राहिलेली आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने+ हॉटस्टार