भारताचा आज बांगलादेशशी, तर इंग्लंडचा न्यूझीलंडशी सामना
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाची गाठ आज रविवारी येथे होणाऱ्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशशी पडणार असून यावेळी त्रुटी दूर करण्याची, विशेषत: दबावाच्या परिस्थितीला प्रतिसाद देताना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याची भारताकडे अंतिम संधी असेल. इंदूर येथे शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी दक्षिण आफ्रिकेला हरविल्याने त्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचल्या असून 30 ऑक्टोबर रोजी येथे होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताला त्यांचे आव्हान पेलावे लागेल.
बांगलादेशवर आज विजय मिळविल्याने यजमान संघाला साखळी फेरीच्या अंती मिळालेल्या चौथ्या स्थानात बदल होणार नाही. बांगलादेशवर विजय मिळवून भारत जास्तीत जास्त आठ गुण मिळवू शकतो. परंतु नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा ते मागे राहतील आणि रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला हरवले, तर ते 11 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. स्पर्धेतील आपले अस्तित्व धोक्यात असताना भारताने मागील सामन्यात न्यूझीलंडचे आव्हान रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. परंतु त्यात त्यांची खरी कसोटी लागली नाही.
भारतासमोर सदर सामन्यात उतरताना बऱ्याच समस्या होत्या आणि त्यापैकी बऱ्याच, विशेषत: त्यांच्या फलंदाजांची चांगल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्याची क्षमता आणि धावांचा वेग याविषयीच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांना यश आले. नि:संशयपणे या सामन्यात भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवलें आणि विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इतर तीन संघांविऊद्धच्या सामन्यांतील पराभवांच्या मालिकेनंतर ही लढत जवळजवळ परिपूर्ण पद्धतीने जिंकली. असे असले, तरी आज कर्णधार हरमनप्रीत कौरच्या फॉर्मवर तसेच रिचा घोषच्या व्यतिरिक्त इतर कोणी डावाचा वेग वाढविण्यास पुढे सरसावेल का यावरही लक्ष राहील. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविऊद्ध शेवटच्या षटकात नऊ धावा करण्यात अपयशी ठरल्याने बांगलादेशचे या विश्वचषकातील अभियान संपुष्टात आले. खात्यात एक विजय असूनही बांगलादेश शेवटच्या स्थानावर फेकला गेला आहे.
दुसरीकडे, उपांत्य फेरीत आधीच स्थान मिळविलेला इंग्लंडचा संघ आज रविवारी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या सामन्यात अडचणीत सापडलेल्या आणि पावसाने सताविलेल्या न्यूझीलंडचा सामना करणार आहे. या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंड त्यांच्या फलंदाजांना दर्जेदार सरावाची संधी मिळेल, अशी आशा बाळगून असेल.