भारत स्वत:चे अंतराळ स्थानक निर्मिणार
राष्ट्रीय अवकाशदिनी पंतप्रधान मोदी यांची घोषणा, शास्त्रज्ञांचे केले कौतुक, सज्ज राहण्याचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची प्रगती उत्कृष्ट असून भारत येत्या काही काळामध्ये स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचा महत्वाचा संदेश भारताचे अवकाश संशोधक आणि लोकांनाही दिला आहे. अवकाशात सखोल संशोधन करण्यासाठी आता शास्त्रज्ञांनी सज्ज रहावे, असे आवाहन करत त्यांनी शास्त्रज्ञांनी साधलेल्या प्रगतीची प्रशंसा केली आहे.
या दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला व्हिडीओ संदेश दिला आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची भरारी स्पृहणीय आहे. आतापर्यंत भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने अनेक अवघड अभियाने यशस्वीरित्या पार केली आहेत. भविष्यकाळात या संस्थेला आणखी मोठी आव्हाने पेलायची आहेत. भारताने चंद्र आणि मंगळ यांच्यापर्यंत स्वत:ची कक्षा वाढविली आहे. भविष्यात भारत स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करणार, हे निश्चित आहे. भारताने भविष्यकाळाचा विचार करण्यासाठी अवकाश संशोधनावर भर दिला आहे. सखोल अवकाश संशोधनाला लाभ अंतिम: मानवाला होणार आहे. त्यामुळे हे क्षेत्र अधिकाधिक विकसीत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आमचे क्षितीज आकाशगंगांपलिकडचे
आमचे क्षितीज आकाशगंगांनाही ओलांडून जाणारे आहे. चंद्र आणि मंगळ यांना गवसणी घातल्यानंतर आता आम्हाला अवकाशात खोलवर प्रवेश करायचा आहे. संशोधनासाठी कोणीतही अंतिम मर्यादा नसते हे अवकाशाची अथांगता आम्हाला दर्शवून देत आहे. यापासून प्रेरणा घेऊन आमच्या शास्त्रज्ञांनी भारतात स्वबळावर अनेक अवकाश उपकरणे निर्माण केली आहेत. आज आम्ही अत्याधुनिक सेमी क्रायोजेनिक इंजिन्स आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन सामग्री निर्माण करण्यात यश मिळविले आहे. भविष्यकाळात याहीपेक्षा अधिक जटील अंतराळ सामग्री निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आम्ही विकसीत करत आहोत. भारताचा अवकाश संशोधन कार्यक्रम जगातील प्रगत देशांच्या तोडीस तोड आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
लवकरच गगनयान अभियान
भारत लवकरच आपला गगनयान प्रकल्प हाती घेत आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो यशस्वी केला जाईल, असा विश्वास मला आहे. अंतराळ संशोधनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड लागते. ते विकसीत करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधक अपार कष्ट घेत आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे, अशी संशोधकांची भलावणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशात केली.
देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे
अवकाश संशोधन अभियान हे देशाच्या प्रगतीसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी महत्वाचे आहे. सांप्रतच्या काळात सर्व दूरसंचार सेवा उपग्रहांच्या माध्यमातून चालविली जाते. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानातही मोठी झेप घेतली असून भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासगी क्षेत्रानेही लक्ष द्यावे
भारताच्या या अवकाश संशोधनाच्या अभियानात खासगी क्षेत्रानेही महत्वाचे आणि मोठे योगदान देण्याची आवश्यकता आहे. आज पाच खासगी स्टार्टअप कंपन्या या क्षेत्रात आहेत. त्या येत्या 10 वर्षांमध्ये अब्जावधी रुपये मूल्याच्या ‘युनिकॉर्न’ कंपन्या म्हणून प्रसिद्धीला येतील, अशी शाश्वती मला आहे. आमची एवढी प्रगती होणे आवश्यक आहे, की आम्ही प्रत्येक वर्षी 50 प्रक्षेपणे करण्याच्या स्थितीत आलो पाहिजे. हे आमचे ध्येय आहे. आमचे अवकाश शास्त्रज्ञ आणि संशोधक ते पूर्ण करुन दाखवितील, असेही प्रतिपादन त्यांनी केले आहे.
राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने...
ड राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश
ड शास्त्रज्ञांनी आजवर मिळविलेल्या यशाचा साऱ्या देशाला रास्त अभिमान
ड अवकाश संशोधनासाठी लागणारी सामग्री देशातच निर्मिण्याचे अभियान
ड भारताच्या प्रगतीसाठी सखाल अवकाश संशोधनाची आहे आवश्यकता