जपान, जर्मनीला मागे टाकून भारत बनणार तिसरी मोठी अर्थव्यवस्था
नवी दिल्ली :
वर्ष 2027 पर्यंत जपान आणि जर्मनी या बलाढ्या देशांना मागे टाकत भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यामध्ये यशस्वी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांनी व्यक्त केला आहे.
हिंद-प्रशांत क्षेत्रिय संवाद या कार्यक्रमामध्ये अर्थमंत्री बोलत होत्या. त्या म्हणाल्या की जागतिक स्तरावरती जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी भारत मात्र आर्थिक वृद्धीमध्ये भारत मोठी कामगिरी पार पाडत आहे. यावर्षी भारताचा विकासदर सात टक्क्यांपेक्षा थोडा कमी असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. इतर प्रमुख विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था ही अधिक मजबूत असल्याचे त्यांनी सांगत भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत योग्य दिशेने उज्वलतेकडे वाटचाल करतोय. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धानंतर आता हमास आणि इस्dराइल यांच्यातील युद्धामुळे एकंदरच जागतिक पातळीवर संदिग्ध परिस्थिती आहे. पण भारताची वाटचाल योग्यतेने असून 2027 पर्यंत जपान आणि जर्मनी यांना भारत अर्थव्यवस्थेत मागे टाकू शकतो, असेही त्या म्हणाल्या.