भारत 1 अब्ज 5जी वापरकर्त्यांचा होणार देश
2031 पर्यंत हा टप्पा प्राप्त करणार असल्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2031 पर्यंत भारत एक अब्ज 5जी सबक्रिप्शन ओलांडणार असून देशात 5जीचा वापर 79 टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आहे. ही माहिती स्वीडिश टेलिकॉम टूल्स कंपनी एरिक्सनने 2025 च्या मोबिलिटी या अहवालामधून दिली आहे. अहवालानुसार, 2025 च्या अखेरीस भारतात 39.4 कोटी 5जी सबक्रिप्शनची नोंदणी होण्याची शक्यता आहे, जी देशातील एकूण मोबाइल सबक्रिप्शनपैकी 32 टक्के राहणार आहे. एरिक्सनने म्हटले आहे की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डेटा बाजारपेठांपैकी एक आहे. भारतात प्रति सक्रिय स्मार्टफोन मोबाइल डेटा वापर दरमहा 36 जीबी आहे, जो जगात सर्वाधिक आहे. दरमहा वापर 65 जीबीपर्यंत वाढण्याचा 2031 पर्यंत अंदाज आहे. अहवालात म्हटले आहे की डेटा वापरात ही वाढ 5जी नेटवर्कचा जलद विस्तार, फिक्स्ड वायरलेस अॅक्सेसचा वाढता वापर आणि परवडणाऱ्या 5जी उपकरणांची उपलब्धता यामुळे होणार आहे.
5जी स्वीकारण्याची गती किती वेगवान?
2025 च्या अखेरीस जगभरात 5जी सबक्रिप्शन 2.9 अब्जपर्यंत वाढतील. हे एकूण मोबाइल सबक्रिप्शनच्या सुमारे एक तृतीयांश असेल. 2031 पर्यंत, जागतिक 5जी सबक्रिप्शन 6.4 अब्जपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, जे एकूण मोबाइल सबक्रिप्शनच्या जवळजवळ दोन तृतीयांश आहे. यापैकी 4.1 अब्ज (65 टक्के) सबक्रिप्शन 5जी स्टँडअलोन (एसए) असण्याची अपेक्षा आहे. फक्त या वर्षीच, जगभरातील ऑपरेटर्सनी 60 कोटी नवीन 5जी सबक्रिप्शन जोडले आहेत. याशिवाय, 40 कोटी लोकांना पहिल्यांदाच 5जी कव्हरेज मिळाले आहे. या वर्षाच्या अखेरीस, चीनबाहेरील जगातील 50 टक्के लोकसंख्येला 5 जी नेटवर्कची सुविधा मिळेल. 2031 पर्यंत, ही व्याप्ती 85 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.भारतात 5जी फिक्स्ड वायरलेस अॅक्सेसची मागणी वेगाने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांकडून होणारा प्रचंड डेटा वापर आणि परवडणाऱ्या ग्राहक परिसर उपकरणांची उपलब्धता आहे. जागतिक स्तरावर, 2031 पर्यंत सुमारे 1.4 अब्ज लोक ब्रॉडबँडशी जोडले जाण्याची अपेक्षा आहे, त्यापैकी 90 टक्के कनेक्शन 5 जी नेटवर्कद्वारे कार्यरत राहणार आहे.