For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था होणार

06:39 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था होणार
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सीआयआयच्या अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमात प्रतिपादन 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते मंगळवारी सीआयआय या औद्योगिक संस्थेच्या अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमात भाषण करीत होते. ‘विकसीत भारताच्या दिशेने प्रवास’ या विषयावर त्यांनी त्यांची मते या कार्यक्रमात मांडली. दहा वर्षांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठी प्रगती केली असून त्यामुळे अर्थसंकल्पाचा आकार तिप्पट वाढला आहे. यावरुन तिचा आवाका समजून येतो, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Advertisement

भारताचा विकासदर प्रतिवर्ष 8 टक्के या प्रमाणात आहे. त्यामुळे लवकरच देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. माझ्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आपल्या 10 वर्षांच्या काळात भांडवली खर्चात पाच पट वाढ करुन तो प्रतिवर्ष 11.11 लाख कोटी रुपयांपर्यंत नेला आहे. आज देशात 1.40 लाख स्टार्टअप उद्योग उभे राहिलेले आहेत. तसेच मुद्रा कर्ज योजनेच्या साहाय्याने 8 कोटी लोकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांमुळे हा टप्पा गाठता आला, अशी माहिती त्यांनी दिली.

25 कोटी लोक दारिद्र्यारेषेबाहेर

गेल्या 10 वर्षांमध्ये भारतातील 25 कोटी गरीबांना दारिद्र्यारेषेबाहेर आणण्यात आम्हाला यश मिळाले. आमच्या सरकारचा भर कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती आणि जीवनमान सुधारण्यावर राहिला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारताचा विकासदर आज जगात इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक असून जगाच्या अर्थवाढीत भारताचा वाटा 16 टक्के आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पायाभूत सुविधावाढ विक्रमी

गेल्या 10 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्माण कार्यावर प्रचंड भर देण्यात आला. ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास होत आहे, ते आजपर्यंत कधीही घडले नव्हते. केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागाला विक्रमी निधी देण्यात आला आहे. करांच्या दरात विक्रमी कपात करुनही केंद्र सरकारचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे भांडवली खर्चात मोठी वाढ करणे शक्य झाले. हे अनेक देशांना जमलेले नाही, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

उच्च विकास, मर्यादित महागाई

उच्च विकासदर आणि महागाई तसेच चलनवाढीवर नियंत्रण हे गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारचे वैशिष्ट्या राहिलेले आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेसमोर जगाप्रमाणेच भारतातही मोठी समस्या निर्माण झाली होती. या काळात आमच्यासमोर अर्थव्यवस्थेतील घट रोखून ती मूळपदावर कशी आणता येईल, हे आव्हान होते. ते आम्ही यशस्वीरितीने पेलले. आता तो काळ मागे पडला असून अर्थव्यवस्था भरारी घेण्याच्या स्थितीत आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ भावना नव्हे...

विकसीत भारत हे केवळ स्वप्न किंवा भावना नाही. तो आमचा आत्मविश्वास आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया घातला गेला असून त्यावर आता देश मोठी झेप घेणार आहे. 2047 पर्यंत भारताला विकसीत देशांच्या पंक्तीत समाविष्ट करण्याचे ध्येय आम्ही साकारु, असे प्रतिपादन त्यांनी केले.

अर्थव्यवस्था भरारी घेण्यास सज्ज

ड कोरोना काळातील मंदगती मागे पडून भारत भरारी घेण्यास सज्ज

ड गेल्या दहा वर्षांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी वाढ, सुधारणा

ड आज जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था केवळ भारत

ड उच्च विकासदर, चलनवाढीवर नियंत्रण हे आमच्या धोरणांचे यश

Advertisement
Tags :

.