For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन महिलांकडून भारताचा मालिकेत व्हाईटवॉश

06:58 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन महिलांकडून भारताचा मालिकेत व्हाईटवॉश
Advertisement

तिसरा सर्वात मोठा पराभव, सामनावीर-मालिकावीर लीचफिल्डचे दमदार शतक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सामनावीर व मालिकावीर लीचफिल्डचे शतक तसेच कर्णधार अॅलिसा हिलीच्या अर्धशतकाच्या जोरावर मंगळवारी येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा 190 धावांनी दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली तर भारताचा हा तिसरा आजवरचा मोठा पराभव आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 339 धावांचे कठीण आव्हान दिले होते. लिचफिल्डने 119 तर हिलीने 82 धावा जमविताना पहिल्या गड्यासाठी 189 धावांची भागिदारी केली. या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने यापूर्वी जिंकले असून आता भारतीय संघाला व्हाईटवॉश टाळण्यासाठी झगडावे लागले. वनडे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची 7 बाद 338 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

ऑस्ट्रेलियाचा हा भारताविरुद्धचा नववा मालिकाविजय असून भारतीय भूमीतील पाचवा मालिकाविजय आहे. यापूर्वी 2018, 2012 मध्ये 3-0 असा तर 1984 मध्ये 4-0 असा पराभव केला होता. याशिवाय 2006 मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात 0-3 तर 2008 मध्ये 0-5 अशा व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले होते.

लीचफील्ड-हिलीची 189 धावांची सलामी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फोबे लिचफिल्ड आणि कर्णधार हिली यांनी भारतीय गोलंदाजीची चांगलीच धुलाई करताना 28.5 षटकात 189 धावांची शतकी भागिदारी केली. पॉवरप्लेच्या पहिल्या 10 षटकात या जोडीने 55 धावा जमविल्या. या जोडीने पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 51 चेंडूत तर शतकी भागिदारी 95 चेंडूत नोंदविली. लिचफिल्डने 50 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह आपले तर कर्णधार हिलीने 59 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. हिली आणि लिचफिल्ड यांनी पहिल्या गड्यासाठीची दीडशतकी भागिदारी 139 चेंडूत पूर्ण केली. डावातील 29 व्या षटकात भारताला पहिले यश मिळवताना पूजा वस्त्रकारने हिलीचा त्रिफळा उडविला. हिलीने 85 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 82 धावा झळकाविल्या. ऑस्ट्रेलियाचे द्विशतक 182 चेंडूत फलकावर लागले.

ऑस्ट्रलियाची ही सलामीची जोडी फुटल्यानंतर आणखी तीन फलंदाज लवकर बाद झाले. अमनज्योत कौरने पेरीला पायचीत केले. तिने 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. श्रेयांका पाटीलने मुनीला 3 धावावर पायचीत केले. श्रेयांकाने आपल्या याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅकग्राला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. लिचफिल्डने आपले शतक 109 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने झळकवले. महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या आतापर्यंतच्या विदेशी संघातर्फे लिचफिल्ड आणि हिली यांनी नोंदविलेली 189 धावांची भागिदारी ही कोणत्याही गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी म्हणजे 2021 साली दक्षिण आफ्रिकेच्या लिझेली ली आणि लॉरा वुलव्हार्ट यांनी पहिल्या गड्यासाठी 169 धावांच्या भागिदारीचा विक्रम केला होता. लिचफिल्डला दीप्ती शर्माकडून जीवदान मिळाले. डावातील 40 व्या षटकात लिचफिल्ड दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर कौरकरवी झेलबाद झाली. तिने 125 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह 119 धावा झळकाविल्या. गार्डनर आणि सदरलँड यांनी सहाव्या गड्यासाठी 39 धावांची भागिदारी केली. 46 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कौरने सुदरलँडला झेलबाद केले. तिने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा मजविल्या. डावातील 46 व्या षटकात सदरलँड तंबूत परतली. श्रेयांका पाटीलने गोलंदाजीच्या आपल्या दुसऱ्या हप्त्यात गार्डनरचा त्रिफळा उडविला. गार्डनरने 27 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा केल्या. वेरहॅमने नाबाद 11 तर किंगने 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 26 धावा केल्या. ऑस्टेलियाच्या डावात 8 षटकार आणि 32 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे श्रेयांका पाटीलने 57 धावात 3 तर अमनज्योत कौरने 70 धावात 2, दीप्ती शर्माने 53 धावात 1 तसेच पुजा वस्त्रकारने 68 धावात 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 10 षटकात 82 धावा झोडपल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर भारताचा डाव 32.4 षटकात 148 धावात आटोपला. भारताच्या केवळ 5 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. सलामीच्या स्मृती मानधनाने 29 चेंडूत  5 चौकारांसह 29, रिचा घोषने 3 चौकारांसह 19, रॉड्रीग्जने 27 चेंडूत 3 चौकारांसह 25, दीप्ती शर्माने 39 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 25, वस्त्रकारने 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. पहिल्या पॉरवप्लेच्या 10 षटकात भारताने 2 गडी गमविताना 53 धावा जमविल्या. भारताचे अर्धशतक 56 चेंडूत, शतक 129 चेंडूत नोंदविले गेले. भारताच्या डावामध्ये 16 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे वेरहॅमने 3 तर मेगान शूट, अॅलाना किंग आणि अॅनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. गार्डनरने 1 बळी मिळविला. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकमेव कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. पण वनडे मालिकेत बलाढ्या ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली.

संक्षिप्त धावफलक : ऑस्टेलिया 50 षटकात 7 बाद 338 (लिचफिल्ड 119, हिली 82, पेरी 16, मुनी 3, मॅकग्रा 0, गार्डनर 30, सदरलँड 23, वेरहॅम नाबाद 11, किंग नाबाद 26, अवांतर 28, श्रेयांका पाटील 3-57, अमनज्योत कौर 2-70, वस्त्रकार 1-68, दीप्ती शर्मा 1-53).

भारत 32.4 षटकात सर्व बाद 148 (स्मृती मानधना 29, रिचा घोष 19, रॉड्रीग्ज 25, दीप्ती शर्मा नाबाद 25, पुजा वस्त्रकार 14, अवांतर 16, वेरहॅम 3-21, शूट 2-23, अॅलाना किंग 2-21, सदरलँड 2-9, गार्डनर 1-38).

Advertisement
Tags :

.