भारत - दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना आज
वृत्तसंस्था/ रांची
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारत अनेक प्रलंबित निवडविषयक कोडी सोडवण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे या मालिकेसाठी संघात परतले असून 2027 मधील विश्वचषकात खेळण्यासंदर्भातील त्यांचे भवितव्य ही मालिका निश्चित करू शकते.
रोहित आणि कोहली दोघेही आता फक्त एकाच आंतरराष्ट्रीय स्वरूपात खेळतात आणि भारत पुढील दोन महिन्यांत फक्त सहा एकदिवसीय सामने खेळणार आहे, तीन दक्षिण आफ्रिकेविऊद्ध आणि तीन जानेवारीमध्ये मायदेशात न्यूझीलंडविऊद्ध. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या आधुनिक काळातील दोन महान खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करता या मालिकांत बरेच काही पणाला लागेल.
या सामन्यांमधील कामगिरीचा 2027 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळण्यावर थेट परिणाम होऊ शकतो. यासंदर्भातील वाट कदाचित पुरती बंद होणार नाही. परंतु या मालिकांतून जे काही निपेजल ते या दोन दिग्गजांची कारकीर्द वाढवू शकते किंवा त्यांना अपरिहार्य अस्ताच्या जवळ नेऊ शकते. योगायोगाने 2013 मध्ये याच जेएससीए स्टेडियमवर रोहित शर्माला पहिल्यांदा पूर्णवेळ सलामीवीर म्हणून पाठिंबा देण्यात आला होता. हा एक निर्णायक क्षण होता ज्याने केवळ त्याच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांतील कारकिर्दीतच नव्हे, तर भारताच्या 50 षटकांच्या सामन्यांकडील दृष्टिकोनातही बदल घडवून आणला.
एका दशकाहून अधिक काळानंतर हा 37 वर्षीय खेळाडू पुन्हा रांचीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी घरच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारत पुन्हा उभरण्याचा प्रयत्न करत असून वेगळ्या प्रकारचे पुनऊज्जीवन शोधत आहे. भारतासाठी ही एकदिवसीय मालिका पुढील वर्षी घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या छायेत होत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडील करार 2027 च्या विश्वचषकापर्यंत चालणार असल्याने त्यांचे पद धोक्यात नाही. मात्र या मालिकेत त्यांच्या डावपेचांची भरपूर छाननी होईल. कसोटी मालिकेतील पराभवानंतर गंभीरची रणनीती आणि संघ निवडीवर प्रश्न उपस्थित झाले आहे. या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याचे हे दुसरे मोठे अपयश आहे. ही एकदिवसीय मालिका गंभीरच्या दृष्टीने भारताचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील डावपेच स्पष्ट करण्याची आणि परिस्थिती स्थिर करण्याची एक महत्त्वाची संधी आहे.
पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय सामन्यांना त्याचे प्राधान्य राहणार नसले, तरी गंभीर भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडील दृष्टिकोनात स्थिरता आणण्यासाठी आणि दिशा दाखविण्यासाठी उत्सुक असेल. बदलत्या भूमिकांची चाचपणी करणे, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील दोन्ही संघात स्थिरता देऊ शकणारे खेळाडू निश्चित करणे यादृष्टीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांचा वापर करण्यास व्यवस्थापन उत्सुक असेल.
या मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती जाणवेल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर नियमित कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतींमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे संघाची फलंदाजांची फळी तर कमकुवत झालेली आहेच, शिवाय संघाचा कर्णधार के. एल. राहुल आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनाही भूमिका आणि जबाबदाऱ्या ठरविताना तडजोड करावी लागेल.
मधल्या फळीचा प्रश्न आणखी नाजूक आहे. व्यवस्थापनाला वॉशिंग्टन सुंदरला फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून पाठिंबा द्यायचा की, आक्रमक नितीशकुमार रे•ाrला खेळवायचा हे ठरवावे लागेल. अधिक संयमी तिलक वर्मावरही विश्वास ठेवता येईल. कर्णधार राहुलने यष्टीरक्षण केल्यास अंतिम संघात रिषभ पंतला संधी मिळेल का हे देखील पाहावे लागेल. भारताचा दृष्टिकोन या मालिकेत व्यावहारिक असायला हवा. वरिष्ठ खेळाडूंना लय परत मिळवू द्यायची, उदयोन्मुख फलंदाजांना जास्त संधी द्यायची आणि प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांचा समावेश असलेल्या गोलंदाजी विभागाचा वापर बुमराहच्या अनुपस्थितीत शेवटच्या षटकांत कसा करता येतो ते तपासून पाहायचे, यावर भर राहायला हवा.
कसोटी मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिका आत्मविश्वासाने या मालिकेत उतरेल. कागिसो रबाडा आणि नॉर्टजे यांची अनुपस्थिती असूनही पाहुण्या संघाला आशा आहे की, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये मिळालेला आत्मविश्वास त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही अनुकूल ठरेल. त्यांची पुन्हा एकदा परिस्थितीशी जुळवून घेताना कसोटी लागेल. कर्णधार टेम्बा बावुमा याच्यासाठी 50 षटकांच्या क्रिकेटमध्येही दक्षिण आफ्रिकेची प्रगती बळकट करण्याची ही संधी आहे.
वरिष्ठ जलदगती गोलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे गेराल्ड कोएत्झी आणि नांद्रे बर्गर यांच्यासारख्या खेळाडूंना भारतीय परिस्थितीत जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल, तर तर डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज पुन्हा एकदा मधल्या षटकांत नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत मध्यवर्ती भूमिका बजावेल. फलंदाजीत त्यांचा भर क्विंटन डी कॉकचा अनुभव, बावुमाची स्थिरता देणारी भूमिका आणि मॅथ्यू ब्रीट्झके, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि टोनी डी झोर्झी यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीवर असेल.
संघ-भारत : के. एल. राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीशकुमार रे•ाr, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, मार्को जॅनसेन, टोनी डी झोर्झी, ऊबिन हर्मन, ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रायन रिकल्टन, प्रेनिलन सुब्रयन.
सामन्याची वेळ : दुपारी 1:30 वा.