For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत आणि इंग्लंड चौथी कसोटी आजपासून

06:05 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत आणि इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Advertisement

इंग्लंडविरुद्ध रांचीमध्ये मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार

Advertisement

वृत्तसंस्था /रांची

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती चिंतेची बाब असली, तरी येथे आज शुक्रवारपासुन सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड एकमेकांशी भिडतील तेव्हा इंग्लंडच्या सखोल नसलेल्या ‘बाझबॉल’ दृष्टिकोनाविऊद्ध खंबीर आणि अनुकूल भारताच्या आव्हानाला निश्चितच धार असेल. राजकोटच्या कोरड्या व उष्ण हवामानातून रांचीच्या तुलनेने अधिक थंड वातावरणात येणे हा इंग्रजांसाठी सध्याच्या घडीला तरी एकमेव सुखदायक घटक आहे. यजमानांविरुद्ध वाट्याला आलेल्या घसरणीमुळे ते 1-2 अशा फरकाने मालिकेत पिछाडीवर पडले आहेत. चौथ्या कसोटीत उतरताना भारताचे लक्ष स्वगृही सलग 17 वी मालिका जिंकण्याकडे असेल. 2012 मध्ये अलिस्टर कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडकडून स्वीकाराव्या लागलेल्या धक्कादायक पराभवानंतर भारत अजिंक्य राहिला आहे. त्यानंतर भारताने 47 पैकी 38 कसोटी जिंकल्या आहेत आणि फक्त तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध).

Advertisement

विराट कोहली, के. एल. राहुल आणि फॉर्मात नसलेला श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्माला युवा खेळाडूंकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यांची कामगिरी ही मालिकेतील आतापर्यंतची सर्वांत मोठी सिद्धी आहे. एकूण 545 धावा करत 109 ची प्रभावी सरासरी राखलेला यशस्वी जैस्वाल असो किंवा राजकोटमध्ये 62 धावा करून कसोटीत पदार्पण केलेला सर्फराज खान असो किंवा तिसऱ्या क्रमांकावर हळूहळू स्थिरावत गेलेला शुभमन गिल असो, भारताच्या युवा फलंदाजांनी सुरळीत संक्रमण कसे घडते ते दाखवून दिले आहे. फिरकीपटूंचे वर्चस्व अपेक्षित असलेल्या मालिकेत सर्वाधिक बळी (17 बळी) घेतलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह रांचीमध्ये खेळणार नसून ही भारताच्या दृष्टीने दुखरी नस ठरू शकते. तीन कसोटी सामन्यांमध्ये 80 पेक्षा जास्त षटके टाकल्यानंतर बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. विझाग येथील कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सहा बळी घेताना त्याने दाखविलेले रिव्हर्स स्विंगवरील प्रभुत्व हा भारताच्या विजयात योगदान देणारा सर्वांत मोठा घटक होता. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. राजकोटच्या पोषक नसलेल्या खेळपट्टीवरही बुमराहने भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले.

पाचवी कसोटी जेथे होणार आहे त्या धरमशालामधील वेगवान गोलंदाजीस पोषक परिस्थिती आणि पुढील आयपीएलचा व्यस्त हंगाम लक्षात घेऊन बुमराहला सध्या ब्रेक देण्यात आला आहे, यामुळे मोहम्मद सिराज हा एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज राहिलेला आहे. रांचीमध्ये दुसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी मुकेश कुमार आणि आकाश दीप या बंगालच्या जोडीतून एकाची निवड होईल. रणजी चषक स्पर्धेत नुकतीच कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना 10 बळी घेतलेला मुकेश केवळ अधिक अनुभवीच नाही, तर विझाग कसोटीत त्याने बुमराहला साथ दिलेली आहे. तेथे त्याने फक्त 12 षटके टाकली आणि दोन्ही डावांमध्ये एक बळी घेतला. भारतीय थिंक टँक आकाश दीपला खेळविण्याचा जुगार खेळतो की, मुकेशला कायम ठेवतो हे पाहावे लागेल. इतिहास पाहिल्यास रांचीतील स्टेडियमची खेळपट्टी दोन सिमर आणि तीन फिरकीपटू संघात ठेवण्याच्या योजनेला अनुकूल राहील. परंतु इंग्लंडला चार स्पिनर्स व एक वेगवान गोलंदाज हे समीकरण आदर्श ठरेल असे वाटते. त्यामुळे बशिरला हार्टले, रेहान अहमद व रूट यांच्यासोबत उतरविले जाऊ शकते. या मालिकेत ऊटने धावांपेक्षा (77) जास्त षटके (107) टाकलेली आहेत.

संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, के. एस. भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशिर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, ज्यो रूट, मार्क वूड.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा., थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18

Advertisement
Tags :

.