For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषकात आज भारत - ऑस्ट्रेलिया अंतिम महामुकाबला

06:58 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषकात आज भारत   ऑस्ट्रेलिया अंतिम महामुकाबला
Advertisement

 घोडदौड कायम राखून तिसऱ्यांदा चषक जिंकण्यास रोहित शर्माचा संघ सज्ज, पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाला सहाव्या जेतेपदाचे वेध

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रविवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार असून ऑस्ट्रेलिया जरी महत्त्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावण्यासाठी विख्यात असला, तरी भारताची या स्पर्धेतील वाटचाल धडाकेबाज राहिली आहे स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ असलेल्या भारताने एक पाऊलही चुकीचे टाकलेले नाही, तर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या सुरूवातीला झालेल्या पराभवातून सावरल्यानंतर कधीही मागे वळून पाहिलेले नाही. असे असले, तरी एक संघ म्हणून भारताने ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर सदर प्रतिष्ठित चषक जिंकण्याच्या दृष्टीने भक्कम दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

Advertisement

या मोहिमेचे रोहित शर्माने कर्णधाराला साजेशा पद्धतीने नेतृत्व केले असून 124 इतक्या स्ट्राईक रेटने स्पर्धेत 550 धावा केल्या आहेत. त्याशिवाय आपल्या आक्रमक फलंदाजीने विराट कोहलीने (90 हून अधिक स्ट्राईक रेटने 711 धावा) ‘रन मशिन’ म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. शुभमन गिलने डेंग्यू आणि संबंधित थकव्याशी लढा देऊन आपला दर्जा वेळोवेळी दाखवला आहे, तर श्रेयस अय्यरने उपांत्य फेरीत शतक झळकावताना त्याच्या आखूड टप्प्याच्या चेंडूसंदर्भातील समस्येवर मात करून दाखविली आहे. त्याने आपले मन स्थिर ठेवून अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण ज्या व्यक्तीने भारताच्या मोहिमेत मोठा बदल घडवून आणला आहे तो म्हणजे मोहम्मद शमी आहे.

’अमरोहा एक्सप्रेस’ने या संघाला अजिंक्य राखण्यात मोलाची भूमिका पार पाडताना 23 बळी मिळविलेले आहेत. सुरुवातीला त्याला संघाला स्थान देण्यात आले नव्हते. तरीही शमीने नंतर इतकी मोठी मजल मारून दाखविली आहे. फलंदाज तुम्हाला सामने जिंकून देतात, पण गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देऊ शकतात, ही जुनी म्हण शमीने पुन्हा एकदा बरोबर सिद्ध करून दाखविली आहे.

के. एल. राहुलचा संयमीपणा, रवींद्र जडेजाचा उपयुक्त अष्टपैलू खेळ, सूर्यकुमार यादवच्या रुपाने उपलब्ध असलेला ‘एक्स-फॅक्टर’ आणि फलंदाजांना गोंधळवून टाकण्याची कुलदीप यादवची क्षमता यामुळे भारतीय संघ भरपूर ताकदवान बनण्यास मदत झालेली आहे. त्याशिवाय संघाकडे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असून डेव्हिड वॉर्नर किंवा स्टीव्ह स्मिथचा बळी घेण्याची कामगिरी चांगल्या प्रकारे करू शकतो.

काळ्या मातीने तयार केलेली खेळपट्टी संथ आणि फिरकीस मदत करण्याची शक्यता आहे. असे असले, तरी भारतीय संघ अश्विनच्या रुपाने तिसरा फिरकीपटू घेऊन उतरणे कठीण वाटत आहे. दुसरीकडे, ‘सँडपेपर गेट’नंतर ऑस्ट्रेलियन संघ बदललेला असला, तरी या पाच वेळच्या विश्वविजेत्यांना महत्त्वाच्या क्षणी खेळ सुधारून जिंकण्याची कला अवगत आहे. ऑस्ट्रेलिया हा कदाचित एकमेव असा संघ आहे जो प्रत्यक्षात भारतावर प्रचंड दबाव आणू शकतो.

“भारत या विश्वचषकात नक्कीच चांगला खेळलेला आहेत. मला वाटते की, आम्ही नक्कीच तसे खेळलेलो नाही. मला वाटते की, आम्ही त्या पहिल्या सामन्यात तुल्यबळ कामगिरी केली नव्हती. परंतु आम्ही त्या सामन्याहून पुढे जाण्याच्या बाबतीत फक्त एका झेलाचा फरक आहे’, असे कर्णधार कमिन्सने विराट कोहलीच्या सोडलेल्या झेलचा संदर्भ देत सांगितले. दोन संघांमधील साखळी फेरीतील सामन्यात, जो त्यांचा सलामीचा सामनाही होता, सदर सोडलेला झेल हा टर्निंग पॉईंट ठरला होता.

 

कमिन्सला चांगलेच माहीत आहे की, 1 लाख 30 हजार प्रेक्षक भारताच्या बाजूने पाठिंबा देतील. परंतु या वर्षाच्या सुऊवातीला त्याच्या संघाने भारतात एकदिवसीय मालिका जिंकली होती याचीही त्याला जाणीव आहे. या पार्श्वभूमीवर आज कोण जिंकणार, विरोधकांना प्रत्येक सामन्यात पुरते नेस्तनाबूत करून दाखविलेले भारतीय की, ऑस्ट्रेलियन हा अत्यंत महत्वाचा प्रश्न असून त्याच्याच उत्तराची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.

संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया-पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झॅम्पा, जोश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी व शॉन अॅबॉट.

सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.

मुकाबला खेळाडूंमधला

रोहित शर्मा विरूद्ध मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड : भारताचा कर्णधार रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेत सुऊवातीच्या पॉवरप्लेमध्ये प्रभावी फटकेबाजी केली आहे. त्यामुळे इतर फलंदाजांवरचे दडपण दूर होऊ शकलेले आहे. आज रविवारी ‘ओपनिंग पॉवरप्ले’मध्ये हेझलवूड आणि स्टार्कविरूद्ध त्याची पुनरावृत्ती करण्याचे मोठे आव्हान रोहितसमोर राहणार आहे. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या साखळी सामन्यात हेझलवूडने रोहितला पायचित केले होते.

मोहम्मद शमी विरूद्ध डावखुरे सलामीवीर : शमीने विशेषत: डावखुऱ्या फलंदाजांना भरपूर सतावलेले आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात त्यानेच डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र या धोकादायक सलामीच्या जोडीला झेल देण्यास भार पाडले. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडला या ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला तो भारी पडू शकतो.

विराट कोहली विरूद्ध अॅडम झॅम्पा : अलीकडच्या काळात कोहलीने अनेकदा डावखुऱ्या फिरकीपटूंविरूद्ध संघर्ष केला आहे. पण लेगस्पिनर झॅम्पानेही त्याला त्रास दिला असून तब्बल आठ वेळा या भारतीय सुपरस्टारचा बळी घेतलेला आहे. त्यामुळे स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आणि सर्वांत यशस्वी फिरकीपटू यांच्यातील लढतीकडे लक्ष द्यावे लागेल.

कुलदीप यादव विरूद्ध ग्लेन मॅक्सवेल : कुलदीपने आपल्या डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर सर्वांनाच सतावलेले आहे. परंतु मॅक्सवेल हा विचित्र पद्धतीने खेळणारा फलंदाज असून त्याच्याकडे असे फटके आहेत जो तोच खेळू शकतो. त्यामुळे मधल्या षटकांत मॅक्सवेलने बाजी मारली, तर कुलदीपसाठी ती सर्वांत कठीण परीक्षा असेल. मॅक्सवेलकडे रिव्हर्स फटके मारून कुलदीपची लय बिघडवण्याची क्षमता आहे. तसे झाले, तर कुलदीपला चाकोरीबाहेरचा विचार करावा लागेल.

डेव्हिड वॉर्नर विरूद्ध जसप्रीत बुमराह : 10 सामन्यांत 18 बळी घेतलेल्या जसप्रीत बुमराहला अद्याप 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये वॉर्नरला बाद करता आलेले नाही, तर वॉर्नरने बुमराहच्या 130 चेंडूंचा सामना करून 117 धावा केल्या आहेत. दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्यापासून बुमराहने त्याच्या शस्त्रांमध्ये एक घातक आउटस्विंगर जोडला आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरला तो त्रास होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वॉर्नर या स्पर्धेत 528 धावांसह आघाडीवर आहे.

Advertisement
Tags :

.