भारत-उझबेक दोन मित्रत्वाचे सामने
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यजमान भारत आणि उझबेक 20 वर्षांखालील वयोगटातील महिलांच्या फुटबॉल संघांमध्ये दोन मित्रत्वाचे सामने आयोजित केले आहेत. यापैकी पहिला सामना शनिवार दि. 29 नोव्हेंबरला तर दुसरा सामना 2 डिसेंबरला आयोजित केला आहे.
तामिळनाडूतील महाबलीपूरममधील एफसी मद्रास अकादमीच्या मैदानावर हे दोन्ही सामने खेळविले जाणार आहेत. फिफाच्या महिला आंतरराष्ट्रीय विंडो अंतर्गत हे सामने राहतील. या सामन्यांसाठी भारताच्या 24 सदस्यांचा संघ प्रमुख प्रशिक्षक जोकिम अॅलेक्झान्डरसन यांनी जाहीर केला आहे. 2026 मध्ये होणाऱ्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाला सरावाच्या दृष्टिकोनातून हे दोन सामने होणार आहेत. आशिया चषक स्पर्धेतील क गटात यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने निश्चितच दर्जेदार कामगिरी करताना बलाढ्या जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन तैपेई यांना बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. मात्र या आगामी स्पर्धेसाठी उझबेकचा महिला संघ ब गटातून पात्र ठरला आहे.