भारत-अमेरिका हॉकी लढत आज
वृत्तसंस्था /भुवनेश्वर
येथील कलिंगा स्टेडियमवर शुक्रवारी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या चौथ्या महिलांच्या 2023-24 च्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत यजमान भारताचा सामना अमेरिकाबरोबर होणार आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविता आले नाही. भारतीय महिला हॉकी संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. अलिकडच्या कालावधीत भारतीय महिला हॉकी संघाला सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. चीनने भारताचा 2-1, नेदरलँड्सने भारताचा 3-1 तर त्यानंतर बलाढ्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-0 असा दणदणीत पराभव केला होता. पराभवाची हॅट्ट्रिक झाल्यानंतर आता भारतीय महिला हॉकी संघ पुन्हा नव्या जोमाने शुक्रवारी अमेरिकेशी लढत देण्यासाठी सज्ज झाला आहे.
या स्पर्धेत अमेरिकेच्या महिला हॉकी संघाला सलामीच्या सामन्यात नेदरलँड्सकडून 7-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अमेरिकेचा 3-0 तर चीनने अमेरिकेचा 3-1 असा पराभव केला होता. भारताप्रमाणेच अमेरिकन महिला हॉकी संघ शुक्रवारच्या सामन्यात पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी प्रयत्न करेल. आतापर्यंत भारत आणि अमेरिका महिला हॉकी संघामध्ये 16 सामने झाले असून त्यामध्ये 10 सामने अमेरिकेने जिंकले आहे तर भारताला चार सामन्यात विजय मिळविता आला आहे. दोन सामने बरोबरीत राहिले आहेत. 2023-24 च्या प्रो लिग महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला विजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल असे कर्णधार सविताने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.