भारत-युएई चांदीच्या आयातीवर करणार चर्चा
संबंधित नियमांवर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक युएईला जाणार
नवी दिल्ली :
चांदीच्या आयातीशी संबंधित नियमांवर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक पुढील आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीला (युएई) भेट देणार आहे. भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार करारानंतर चांदीच्या आयातीत झालेली वाढ लक्षात घेऊन हे पाऊल उचलले जात आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले, ‘आमच्याकडे एक संयुक्त व्यापार समिती आहे जी या मुद्यांवर काम करते. या संयुक्त समितीअंतर्गत विशेष विषयांवर चर्चा केली जाते. पुढील आठवड्यात त्यांची यूएईमध्ये बैठक आहे, ज्यासाठी आमचा संघ लवकरच निघणार आहे.’
गोयल म्हणाले की त्यांनी यापूर्वी त्यांचे यूएई समकक्ष थानी अल जैहोदी यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. ते म्हणाले, युएईने आश्वासन दिले आहे की ते भारताच्या व्यापार आणि व्यावसायिक हितांना हानी पोहोचवणार नाहीत.
नवी दिल्ली विशेषत: या आयातीशी संबंधित मूल्य-समायोजन नियमांबद्दल चिंतीत आहे आणि या वस्तूंच्या निर्यातीच्या नियमांबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
भारताने फेब्रुवारी 2022 मध्ये यूएईसह सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली जी त्याचवर्षी मे मध्ये लागू झाली. या कराराअंतर्गत चांदीवर सध्या 8 टक्के आयात शुल्क आहे. करारानुसार, भारताने पुढील आठ वर्षांमध्ये हळूहळू हे शुल्क शून्यावर आणण्याचे आश्वासन दिले आहे.
यूएईमधून चांदीची आयात आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5,853 टक्क्यांनी वाढली, 1.74 अब्ज वरून 29 दशलक्ष डॉलर ही वाढ प्रामुख्याने व्यापार करारांतर्गत मान्य केलेल्या टॅरिफ सवलतींमुळे झाली आहे.