तुर्कियेतील स्पर्धेसाठी भारताचा यू-20 महिला संघ जाहीर
19 फेब्रुवारीपासून होणार पिंक लेडीज यू-20 युथ चषक फुटबॉल स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पिंक लेडीज यू-20 युथ चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय यू-20 महिला संघाचे प्रशिक्षक जोआकिम अलेक्झांडरसन यांनी 23 सदस्यीय संघाची घोषणा केली असून ही मैत्रिपूर्ण स्पर्धा तुर्कियेतील मानवगत येथे 19 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 19 फेब्रुवारी रोजी भारतीय महिलांची सलामीची लढत जॉर्डनशी होईल. त्यानंतर 22 रोजी हाँगकाँगविरुद्ध व 25 फेब्रवारी रोजी रशियाविरुद्ध पुढील लढती होतील. अँटाल्या जिल्ह्यातील मानवगत शहरामधील एमिरहा स्पोर्ट सेंटर येथे सर्व सामने खेळविले जाणार आहेत. येत्या जुलै-ऑगस्टमध्ये सॅफ यू-20 महिला चॅम्पियनशिप व एएफसी यू-20 आशियाई चषक पात्रता स्पर्धा होणार आहेत, त्याच्या तयारीसाठी बेंगळूरमधील स्पोर्ट्स स्कूल येथे भारतीय महिलांचे ट्रेनिंग सुरू आहे.
तुर्कियेला जाणाऱ्या संघात बेंगळूरमध्ये डिसेंबरपासून शिबिरात असणाऱ्या तसेच 7 फेब्रुवारी रोजी भारतीय महिला लीगची शेवटची सहा फेरी संपल्यानंतर शिबिरात दाखल झालेल्या खेळाडूंचा समावेश असेल. तोइजम थोइबिसाना चानू व काजोल डिसोझा या दोघी अनंतपूर येथे वरिष्ठ महिला संघासमवेत ट्रेनिंग घेत आहेत, त्यांना तुर्कियेतील संघात सामील करण्यात आले आहे. आज रविवारी हा संघ तुर्कियेला बेंगळूरमधून रवाना झाला आहे.
भारताचा यू-20 महिला संघ : गोलरक्षक-केइशम मेलोडी चानू, मोइरंगथेम मोनालिशा देवी, रिबान्सी जामू. बचावफळी-अॅलिना चिंगाखम, निशिमा कुमारी, सहेना टीएच, शुभांगी सिंग, थिंगबैजम संजीता देवी, टोइजम थोइबिसाना चानू, विकसित बारा. मध्यफळी-सिन्डी रेमरुआतपुई कॉलनी, काजोल डिसोझा, के. अंजू चानू, के. भूमिका देवी, मोनिशा सिंघा, एन. अरिना देवी. आघाडी फळी-बबिता कुमारी, दीपिका पाल, खुशबू सरोज, ल्हिंगदेइकिम, नेहा, एन. सिबानी देवी, पूजा. प्रशिक्षक : जोआकिम अलेक्झांडरसन. साहायक प्रशिक्षक : निवेता रामदास. गोलरक्षक प्रशिक्षक : केके हमीद.