भारत यू-19 संघाचा दणदणीत विजय
दुसरी युवा कसोटी : हेनिल पटेल, नमन पुष्पकचा भेदक मारा, ऑस्ट्रेलिया युवा संघाचा 7 गड्यांनी पराभव
वृत्तसंस्था/ मॅके, ऑस्टेलिया
येथे झालेल्या दुसऱ्या युवा कसोटी भारताच्या यू-19 संघाने ऑस्ट्रेलिया यू-19 संघाचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव करून दोन सामन्यांची ही मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी चमकदार प्रदर्शन केल्याने हा विजय साकार करता आला.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया युवा संघाचा डाव 135 धावांत गुंडाळल्यानंतर भारत युवा संघाने दिवसअखेर 7 बाद 114 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला आणि 51.4 षटकांत भारताचा डाव 171 धावांत आटोपला. भारताला पहिल्या डावात 36 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलिया युवा संघाचे फलंदाज दुसऱ्या डावातही भारताच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले आणि त्यांचा डाव 40.1 षटकांत केवळ 116 धावांत आटोपला. त्यामुळे भारत युवा संघाला 81 धावांचे विजयाचे आव्हान मिळाले.
भारत युवा संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. स्टार सलामीवीर कर्णधार आयुष म्हात्रे व वैभव सूर्यवंशी झटपट बाद झाले. सूर्यवंशी शून्यावर बाद झाला तर म्हात्रे 13 धावा काढून बाद झाला. पण नंतर विहान मल्होत्रा (21), वेदांत त्रिवेदी (नाबाद 33), राहुल कुमार (नाबाद 13) यांनी विजयाचे सोपस्कार 12.2 षटकांत पूर्ण करून विजय साकार केला.
भारतीय संघाने आव्हानाचा पाठलाग करताना परीक्षा पाहणाऱ्या खेळपट्टीवर अतिआक्रमक धोरण अवलंबल्याने सूर्यवंशी व म्हात्रे झटपट बाद झाले. सूर्यवंशीने पहिल्या षटकातील सहाव्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो यशस्वी झाला नाही आणि पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर म्हात्रे कॅसी बार्टनचा चेंडूवर यष्ट्यांवर ओढवून घेतला.
ऑस्ट्रेलिया युवा संघाला भारतीय गोलंदाजी खेळणे खूपच जड गेले. जलद गोलंदाज हेनिल पटेलने सिमॉन बज व झेड हॉलिक यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया युवा संघाची स्थिती 2 बाद 0 अशी झाली. या धक्क्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. हेनिल पटेलने 23 धावांत 3, नमन पुष्पकने 19 धावांत 3, उद्धव मोहनने 17 धावांत 2 बळी मिळविले. पहिल्या डावात अर्धशतक नोंदवणारा अॅलेक्स ली यंगने या डावात सर्वाधिक 38 धावा जमविल्या. भारत युवा संघाने याआधी ती सामन्यांची युवा वनडे मालिकाही एकतर्फी जिंकली होती.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया यू-19 संघ प.डाव 135, दु.डाव 40.1 षटकांत सर्व बाद 116 : अॅलेक्स ली यंग 38, हेनिल पटेल 3-23, नमन पुष्पक 3-19, उद्धव मोहन 2-17. भारत यू-19 संघ प.डाव सर्व बाद 171. दु. डाव 12.2 षटकांत 3 बाद 84 : वेदांत त्रिवेदी नाबाद 33, विहान मल्होत्रा 21, राहुल कुमार नाबाद 13, कॅसी बार्टन 2-32.