मालदीवला भारत संरक्षण साधने देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत, दोन्ही देश द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक बळकट करणार
वृत्तसंस्था / माले
मालदीव हा भारताचा निकटचा मित्रदेश असून त्याची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी भारत साहाय्य करणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ब्रिटनहून मालदीवला आपल्यानंतर त्यांचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. येथील भारतीय वंशाच्या समुदायाने त्यांच्या जयजयकाराच्या घोषण दिल्या. या स्वागत कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मालदीवला संरक्षण साधने देण्याचे आणि कर्जपुरवठा करण्याचे भारताने मान्य केल्याची माहिती नंतर देण्यात आली.
चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वर्षी भारत आणि मालदीव हे दोन्ही देश आपल्या द्विपक्षीय संबंधाची शष्ट्याब्दी साजरी करत आहेत. तथापि, आमच्या संबंधांची मुळे इतिहासाइतकीच जुनी आहेत आणि समुद्राइतकी सखोल आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. दोन्ही नेत्यांच्या हस्ते दोन्ही देशांच्या पारंपरिक नौकांचे चित्रण असलेल्या एका पोस्ट तिकिटाचेही अनावरण करण्यात आले. भारताच्या ‘शेजारी देश प्रथम’ या धोरणात मालदीवचे स्थान महत्वाचे आहे. भारत आणि मालदीव हे केवळ मित्र नाहीत, तर सहप्रवासी आहेत, अशीही भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यात केली.
संरक्षण पाठबळ देणार
मालदीव देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी भारत साहाय्य करणार आहे. या देशाला संरक्षण साधने पुरविण्यास भारत सज्ज आहे. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य करणे, हे दोन्ही देशांसाठी हिताचे आहे. दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास यामुळे वाढीला लागणार आहे. मालदीवचे हित भारतासाठीही महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कर्जाच्या रकमेत वाढ
मालदीवच्या विकासासाठी भारत 56.5 कोटी डॉलर्सचे कर्ज देणार आहे, अशी घोषणाही या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम साधारणत: 4 हजार 860 कोटी रुपये होते. तसेच दोन्ही देशांनी परस्पर व्यापार वाढविण्यासाठीही महत्वाची पावले उचलली आहेत. आर्थिक भागीदारीचा पाया विस्तारण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असाही निर्णय घेण्यात आला आहे. मालदीवचे अध्यक्ष मुईझ्झू यांनीही भारताशी घनिष्ट संबंधांचे महत्व विशद केले. भारताने केलेल्या साहाय्यामुळे मालदीवचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे, असे प्रतिपादन मुईझ्झू यांनी केले.
भारत पुरविणार 72 सेना वाहने
भारत मालदीवला 72 आधुनिक सेना वाहने पुरविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. ही वाहने मालवाहतुकीसाठी, तसेच मानवी वाहतुकीसाठी उपयोगी ठरणार आहेत. या वाहनांमध्ये अवजड चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यांचा उपयोग मालदीवला संरक्षण यंत्रणा वेगवान करण्यासाठी होणार आहे, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.
मालदीवमध्ये घरे बांधणार
भारताने मालदीवमध्ये 3 हजार 300 घरे आणि सदनिका बांधण्यास सहमती दर्शविली आहे. हुथूमाली भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत. मालदीवमध्ये भारत पायाभूत सुविधा क्षेत्रामध्येही गुंतवणूक करणार असून या देशात मार्गनिर्मिती आणि भूमीविकास करण्यासाठी भारत उत्सुक आहे. या संबंधांमधील करार लवकरच करण्यात येणार आहेत. दोन्ही देशांमध्ये जनसंपर्क वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर केले आहे.
मालदीवसाठी भारताच्या सुविधा
ड मालदीवच्या विकासासाठी भारताकडून 486 कोटी रुपयांचे कर्ज
ड मालदीवने भारताकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सुलभ होणार
ड भारत मालदीवशी मुक्त व्यापार करारासाठी चर्चा करण्यास सज्ज
ड इंडिया बायर व्रेडीट सुविधेअंतर्गत 3,300 घरांची बांधणी करणार
ड मालदीवच्या अद्दू शहरात भारत मार्ग आणि ड्रेनेज व्यवस्था करणार
ड मालदीवमध्ये उच्च प्रतीचे समाजविकास प्रकल्प हाती घेतले जाणार
ड मालदीवला 72 अवजड सेना वाहने आणि इतर सामग्री पुरविणार