कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेचे यजमानपद भारताला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 साली आयएसएसएफची कनिष्ठांची विश्वचषक नेमबाजी स्पर्धा भारतात होणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनने रविवारी ही घोषणा केली. भारताने भविष्य काळात अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली तर आयएसएसएफकडून त्यांना नेहमीच पाठिंबा राहिल, असे स्पष्टीकरण फेरडरेशनचे अध्यक्ष लुसियानो रॉसी यांनी दिले आहे.
आयएसएसएफचे अध्यक्ष रॉसी हे सध्या दिल्लीत आले आहेत. चालू वर्षाअखेरीस संपणाऱ्या या नेमबाजी हंगामातील शेवटची विश्वचषक फायनल नेमबाजी स्पर्धा होत असून या स्पर्धेवेळी ते उपस्थित राहणार आहेत. पेरुमध्ये नुकत्याच झालेल्या कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे रॉसी यांनी म्हटले आहे. 2025 सालातील कनिष्ठांची विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या यजमान पदासाठी भारताने अर्ज केल्यास त्यांना आयएसएसएफचा निश्चितच पाठिंबा राहिल.
नवी दिल्लीतील डॉ. करनी सिंग नेमबाजी संकुलात मंगळवारपासून सुरु होणाऱ्या विश्वचषक फायनल नेमबाजी स्पर्धेत भारताचा 23 जणांचा संघ सहभागी होणार असल्याचे अखिल भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष कालीकेश सिंग देव यांनी सांगितले.