भारताने उडवला कझाकस्तानचा 15-0 ने धुव्वा
वृत्तसंस्था/ राजगीर
भारतीय पुरुष हॉकी संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेतील शेवटच्या साखळी लढतीत कझाकस्तानचा 15-0 ने धुव्वा उडवला. सोमवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना आशिया चषकातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. तसेच सुपर फोरमधील स्थानही निश्चित केले. भारताच्या विजयात अभिषेकने 4, सुखजीत, जुगराज सिंगने प्रत्येकी 3 गोल करत मोलाचे योगदान दिले.
पहिल्या सामन्यात चीन तर दुसऱ्या सामन्यात जपानला नमवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी कझाकस्तानविरुद्ध शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. सुरुवातीपासून आक्रमक खेळताना त्यांना कझाक संघाला एकही गोल करु दिला नाही. भारताच्या अभिषेकने 5 व्या, 8 व्या, 20 व्या आणि 59 व्या मिनिटाला चार गोल करत सामन्याला रंगत आणली. सुखजीत सिंहने 15 व्या, 32 व्या आणि 38 व्या मिनिटाला, तर जुगराज सिंगने 24 व्या, 31 व्या आणि 47 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने 26 व्या मिनिटाला एक गोल केला, तर अमित रोहिदास (29 वे), राजिंदर सिंग (32 वे), संजय सिंग (54 वे) आणि दिलप्रीत सिंग (55 वे) यांनीही गोल करत टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले. विशेष म्हणजे, आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाने मध्यंतरापर्यंत 7 गोल केले. यानंतर तिसऱ्या व चौथ्या सत्रात 8 गोल करत कझाकस्तानचा धुव्वा उडवला. भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह भारताने अ गटात 9 गुणासह अव्वलस्थान पटकावले तर चीनचा 4 गुणासह दुसऱ्या स्थानी राहिला.
सुपर चारमध्ये आता दक्षिण कोरियाचे आव्हान
सुपर 4 मध्ये भारतासह चीन, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या चार संघांनी प्रवेश केला आहे. भारत आणि मलेशियाकडे प्रत्येकी 9 गुण, कोरियाकडे 6, तर चीनकडे 4 गुण आहेत. सुपर 4 मध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळेल. भारताला मलेशिया, कोरियाशी दोन हात करावे लागतील. यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. टीम इंडियाची पुढील लढत दि. 3 रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध होईल.