विश्व चषक नेमबाजीत भारत तिसरा
पदक तक्त्यात चीन पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था / लिमा (पेरु)
येथे झालेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पदक तक्त्यात भारताने 2 सुवर्ण, 4 रौप्य, 1 कांस्य एकूण 7 पदकांसह तिसरे स्थान मिळविले. यामध्ये चीनने 13 पदकांसह पहिले तर अमेरिकेने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य 7 पदकांसह दुसरे स्थान मिळविले.
मिश्र सांघिक एअररायफल नेमबाजीत आर्या बोर्से आणि रुद्रांक्ष पाटील यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले. मात्र ट्रॅप मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या पृथ्वीराज तोंडाईमन आणि प्रगती दुबे यांना पदक फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. या स्पर्धेमध्ये भारताच्या सुरुची इंदर सिंगने शानदार कामगिर करत दोन सुवर्ण पदके मिळविली. तिने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील दुहेरी पदक विजेती मनु भाकरला मागे टाकले. तसेच तिने सौरभ चौधरी समवेत मिश्र सांघिक 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले.
या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकने 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदकासह चौथे स्थान, नॉर्वेने 1 सुवर्ण, 2 रौप्य पदकांसह पाचवे, इटलीने 1 सुवर्ण 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह सहावे, ऑस्ट्रेलियाने 1 सुवर्णासह सातवे, गुटमेलाने 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह आठवे, ब्राझीलने 1 रौप्य पदकासह नववे, स्पेनने 1 रौप्य पदकासह दहावे, हंगेरीने 2 कांस्य पदकासह अकरावे, क्रोयशीयाने 1 कांस्य पदकासह बारावे तसेच जर्मनीने 1 कांस्यपदकास शेवटचे स्थान मिळविले.