भारत-द. आफ्रिका निर्णायक सामना आज
वृत्तसंस्था/चेन्नई
यजमान भारत आणि द. आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये येथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मंगळवारी तिसरा आणि निर्णायक सामना खेळविला जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल.
चेन्नईमध्ये सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे मंगळवारच्या सामन्यावरही साशंकतेचे सावट पसरले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताचा 12 धावांनी पराभव करुन आघाडी घेतली. त्यानंतर रविवारचा दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. आता मंगळवारच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करणे जरुरीचे आहे. भारताच्या दौऱ्यामध्ये द. आफ्रिका महिला संघाला वनडे मालिका तसेच त्यानंतर एकमेव कसोटी सामना गमवावा लागला आहे. आता या दौऱ्याच्या अखेरीस द. आफ्रिकेचा सामना टी-20 मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट करण्यासाठी आतुरलेला आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय गोलंदाजी म्हणावी तशी प्रभावी झालेली नाही. पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने 189 धावा तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 177 धावा जमविल्या. या दोन्ही सामन्यात भारताची हुकमी फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा प्रभावी ठरली नाही. पूजा वस्त्रकरने यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात प्रत्येकी दोन गडी बाद केले. रेणूकासिंग ठाकुर, श्रेयांका पाटील, राधा यादव यांना आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. कर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधना आणि रॉड्रीग्ज तसेच अष्टपैलु रिचा घोष यांच्यावर फलंदाजीची भिस्त राहिल. द. आफ्रिका संघाची कर्णधार वूलव्हर्ट, ब्रिटस्, बॉश्च, कॅप, लुस, ट्रायोन यांना मात्र या मालिकेत सूर मिळाल्याचे दिसून येते. मंगळवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरेल.