भारत-ताजिकिस्तान फुटबॉल सामना आज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा पुरूष फुटबॉल संघ सध्या ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर असून मित्रत्वाचे दोन फुटबॉल सामने खेळविले जाणार आहेत. यापैकी पहिला सामना येथे बुधवारी होणार आहे. 2026 च्या एएफसी 23 वर्षांखालील आशिया चषक पात्र फेरी फुटबॉल स्पर्धेसाठी ही पूर्वतयारी म्हणून हे सामने आयोजित केले आहेत.
भारत आणि यजमान ताजिकिस्तान यांच्यात बुधवारी होणाऱ्या मित्रत्वाच्या पहिल्या सामन्यात भारतीय फुटबॉलपटूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहिल. या दौऱ्यातील दुसरा सामना येत्या शनिवारी किर्जीस्तान प्रजासत्ताकबरोबर होणार आहे. एएफसी 23 वर्षांखालील आशिया चषक 2026 च्या पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत भारताचा ई गटात समावेश असून या गटामध्ये बहरीन, कतार, ब्रुनेई दारुसलेम यांचा सहभाग आहे. ही पात्र फेरीची स्पर्धा सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे. भारतीय फुटबॉल संघाला नौशाद मुसा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 1 जूनपर्यंत या सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या 23 सदस्यांच्या फुटबॉल संघाकरिता कोलकाता येथे सराव शिबिर आयोजित केले होते.
भारतीय फुटबॉल संघाचे सोमवारी रात्री ताजिकिस्तानची राजधानी डुशनबे येथे आगमन झाले. मंगळवारी भारतीय फुटबॉल संघाने दोन सत्रांमध्ये सराव केला. ताजिकिस्तानच्या 23 वर्षांखालील फुटबॉल संघाने 2024 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या संयुक्त अरब अमिरात विरुद्धच्या मित्रत्वाच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करला होता. 2024 च्या एएफसी 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत ताजिकिस्तानचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाले होते. त्यांना इराक आणि सौदी अरेबिया यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता तर ताजिकस्थानने थायलंडवर विजय मिळविला होता. गेल्या वर्षी मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 23 वर्षांखालील फुटबॉल संघाने मलेशियाबरोबर दोन मित्रत्वाचे सामने खेळले होते. बुधवारच्या सामन्याला रात्री 8.30 वाजता प्रारंभ होईल.