मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव
चौथी कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची मालिकेत 2-1 ने आघाडी : शेवटच्या सत्रात सात विकेट्स
वृत्तसंस्था/ मेलबर्न
एमसीजी ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या बॉक्ंिसग डे कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. टीम इंडियाला चौथ्या डावात 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण डाव 155 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 84 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. नितीश रे•ाr यांच्या शतकी खेळीमुळे भारताला फॉलोऑन वाचवण्यात यश आले. दुसऱ्या डावात कांगारुंनी 234 धावा केल्या, त्यामुळे चौथ्या डावात भारताला 340 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते. पण टीम इंडियाला विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, एका क्षणाला भारतीय संघ हा कसोटी सामनाही ड्रॉ करेल अशी आशा होती, पण भारताच्या फलंदाजांनी या निर्णयावर पाणी फेरले आहे. भारताच्या 7 फलंदाजांनी तासाभरात एकापाठोपाठ आपल्या विकेट्स गमावल्या. एकूण 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही कसोटी क्रिकेटमधील 49वी वेळ आहे.
जैस्वालची झुंज अपयशी, इतर फलंदाज मात्र फ्लॉप
चौथ्या दिवशी 9 गडी गमावून 333 धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी 6 धावांची भर घातली आणि भारताला 340 धावांचे लक्ष्य दिले. भारताने पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत 33 धावांवर 3 मोठे विकेट गमावले. सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल व विराट कोहली स्वस्तात बाद झाले. यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या सत्रात एकही विकेट न गमावता 3 बाद 112 धावा केल्या. भारतीय संघ हा सामना अनिर्णित ठेवेल असे एकवेळ चित्र होते, पण तिसऱ्या सत्रात भारताने पहिल्या तासाभरातच झटपट 7 विकेट्स गमावल्या. यामध्ये ऋषभ पंतने पुल शॉट खेळत आपली विकेट गमावली, त्याच्या या शॉटवरून कर्णधार रोहितसह सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. यानंतर जैस्वाल 84 धावा करून खेळत होता आणि शॉर्ट चेंडूवर फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला, पण तिसऱ्या पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केले. जैस्वालने सर्वाधिक 8 चौकारासह 84 धावा फटकावल्या. जैस्वाल बाद झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच टीम इंडियाचा डाव 155 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 474 व दुसरा डाव सर्वबाद 234
भारत पहिला डाव 369 व दुसरा डाव 79.1 षटकांत सर्वबाद 155 (यशस्वी जैस्वाल 84, ऋषभ पंत 30, रोहित शर्मा 9, आकाशदीप 7, पॅट कमिन्स व बोलँड प्रत्येकी तीन बळी, लियॉन 2 बळी).
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाचा मार्ग कठीण
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळली जाणारी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. जर टीम इंडिया सिडनी कसोटी हरली किंवा सामना अनिर्णित राहिला तर त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याच्या आशा पूर्णपणे संपुष्टात येतील. टीम इंडियाने सिडनी कसोटी जिंकल्यास संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. तसेच भारताविरुद्ध सिडनी कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका एकतर्फी जिंकावी लागेल. तरच त्यांना अंतिम फेरी गाठता येईल व टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. या मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्यास टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल.
यशस्वी जैस्वालच्या विकेटवरुन वादंग, राजीव शुक्ला, गावसकर भडकले
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या सामन्यात 84 धावा करून आऊट झालेल्या यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मैदानावरील पंचांनी यशस्वीला नाबाद घोषित केले होते, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. स्निकोमीटरने चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क दर्शविला नाही, परंतु तरीही तिसऱ्या पंचानी जैस्वालला बाद केले. तिसऱ्या अंपायरच्या या निर्णयामुळे यशस्वी खूप संतापलेला दिसला आणि ड्रेसिंग रूममध्ये परतण्यापूर्वी त्याने अंपायरशी वाद घातला. हा वाद झाला कारण रिह्यूमध्ये जेव्हा चेंडू यशस्वीच्या बॅट आणि ग्लोव्हजजवळून गेला, तेव्हा स्निकोमीटरवर कोणतीही हालचाल दिसली नाही. यानंतरही तिसऱ्या पंचानी मैदानावरील पंचाचा निर्णय बदलून यशस्वीला आऊट दिले. हा निर्णय पाहताच मैदानावर उपस्थित भारतीय प्रेक्षकांनी एकच गोंधळ घातला आणि गदारोळ सुरु केला. यशस्वीच्या विकेटनंतर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला व माजी क्रिकेटर सुनील गावसकर भडकल्याचे दिसून आले.
हा पराभव खूपच निराशाजनक आहे. आम्ही मैदानावर लढण्याची इच्छाशक्ती गमावली असे नाही. आम्ही शेवटपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने आम्हाला यश मिळू शकले नाही. कसोटी सामन्यादरम्यान आम्हाला अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा उठवण्यात आम्ही अपयशी ठरलो.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा