पॅलेस्टाइनच्या प्रस्तावापासून भारत राहिला दूर
मतदानात घेतला नाही भाग
वृत्तसंस्था /संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत पॅलेस्टाइनशी निगडित प्रस्तावावर मतदान झाले आहे. परंतु भारताने यात भाग घेतला नाही. पॅलेस्टिनी क्षेत्रातील स्वत:चा अवैध कब्जा इस्रायलने 12 महिन्यांच्या आत हटवावा अशी मागणी या प्रस्तावाद्वारे करण्यात आली होती. 193 सदस्यीय महासभेने हा प्रस्ताव संमत केला आहे. प्रस्तावाच्या बाजूने 124 देशांनी तर विरोधात 14 देशांनी मतदान केले आहे. भारतासमवेत 43 देशांनी या मतदानापासून अंतर राखले आहे.
मतदानात भाग न घेणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, नेपाळ, युक्रेन आणि ब्रिटन सामील आहे. तर इस्रायल आणि अमेरिकेने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आहे. पॅलेस्टाइकडून निर्मित या प्रस्तावात इस्रायल सरकारची कठोर निंदाही करण्यात आली आहे. इस्रायलला स्वत:च्या कब्जातील पॅलेस्टिनी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कुठल्याही प्रकारच्या उल्लंघनासाठी उत्तरदायी ठरविण्यात यावे असे प्रस्तावात म्हटले गेले होते.
तर दुसरीकडे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने इस्रायलच्या कारवाइंत मारले गेलेल्या 34,344 पॅलेस्टिनी नागरिकांची ओळख जारी केली आहे. मंत्रालयाने मृतांचे नाव, वय आणि ओळख क्रमांकाची एक यादी प्रकाशित केली आहे. या यादीत कारवाईत मारले गेलेल्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक पॅलेस्टिनींची नावे सामील आहेत. तर यादीत सामील नावांसोबत इस्रायलसोबतच्या संघर्षात मारले गेलेल्या उर्वरित 7,613 लोकांची नावे जोडल्यास मृतांचा आकडा 41 हजारांहून अधिक होणार आहे. त्यांचे मृतदेह रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत, परंतु त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.