भारत-श्रीलंका आज औपचारिक लढत
जितेश शर्माला संधी मिळण्याची अखेरची संधी, बुमराहसह काही जणांना विश्रांती मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/दुबई
2025 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्या सुपर चार फेरीतील शेवटचा सामना शुक्रवारी खेळविला जाणार आहे. भारताने या स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखत अंतिम फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केले असल्याने भारताची ही लढत केवळ औपचारिकता राहील. दरम्यान जितेश शर्माला फिनीशरसाठी शेवटची चाचणी या सामन्यात भारताला घ्यावी लागेल. संघातील नियमीत यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसन हा तंदुरुस्त नसल्याने कदाचित जितेश शर्माला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाने सुपर-4 फेरीत पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला तर त्यानंतर भारताने बुधवारच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करुन या स्पर्धेची सर्वप्रथम अंतिम फेरी गाठली. दरम्यान सुपर-4 फेरीतील लंकन संघाने बांगलादेश आणि पाकबरोबरचे सामने गमविल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.गुरूवारी होणाऱ्या पाक आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात विजय मिळविणारा संघ अंतिम फेरीत स्थान मिळवू शकेल. पण रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पुन्हा तिसऱ्यांदा पाकबरोबर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारच्या सामन्यासाठी संजू सॅमसनच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जाते. या स्पर्धेत सॅमसनचे यष्टीरक्षण दर्जेदार होऊ शकले नाही. त्याच्याकडून 10 जीवदाने दिली गेली. बुधवारच्या सामन्यात एकूण बांगलादेशला पाच जीवदाने मिळाली. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीकडून यापूर्वीच्या सामन्यात क्षेत्ररक्षण दर्जेदार न झाल्याने त्याला संघ व्यवस्थापनाकडून खेळविले गेले नव्हते पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याची गोलंदाजी प्रभावी ठरली तसेच त्याच्या क्षेत्ररक्षणातही चांगली सुधारणा झाल्याचे जाणवले.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले आतापर्यंतचे सर्व म्हणजे पाच सामने सहज जिंकले. अक्षर पटेलच्याआधी संजू सॅमसनला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठविण्याबाबत संघव्यवस्थापन विचार करीत आहे. शिवम दुबेला फलंदाजीत बढती देवून त्याला चौथ्या क्रमांकावर पाठविण्याची चर्चा चालू आहे.
भारत - सूर्यकुमार यादव (कर्णधार), गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दीक पंड्या, शुभम दुबे, अक्षर पटेल, बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंग
लंका: चरिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडीस, निशांका, कमिल मिशारा, कुसल परेरा, डी. शनाका, कमिंदु मेंडीस, हसरंगा, वेलालगे, डी. चमिरा, एन. तुषारा, एन. फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लियानगे, महेश पथीराणा आणि महेश थीक्षाणा.
सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता