भारत, स्पेन, नेदरलँड्स उपांत्यपूर्व फेरीत
कनिष्ठ हॉकी स्पर्धा : विजय मिळवूनही इंग्लंड आगेकूच करण्यात अपयशी
वृत्तसंस्था/ चेन्नई
एफआयएच पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारत, स्पेन, नेदरलँड्स या संघांनी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. मात्र इंग्लंडने विजय मिळविला असला तरी त्यांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यास ते पुरेसे ठरले नाही.
भारताने स्वित्झर्लंडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. मनमीत सिंगने (दुसऱ्या व 11 वे मिनिट) 2 तर शारदानंद तिवारीने (13 व 54 वे मिनिट) पेनल्टी कॉर्नर्सवर भारताचे गोल नोंदवले. या विजयानंतर भारताने गट ब मध्ये अपराजित राहत 9 गुणांसह अग्रस्थान मिळविले आहे. भारताचा आणखी एक गोल अर्शदीप सिंगने 28 व्या मिनिटाला नोंदवला. स्वित्झर्लंडने या सामन्यात अधूनमधून चमकदार खेळ केला. पण भारताने त्यांना यश मिळू दिले नाही. भारताची उपांत्यपूर्व लढत 5 डिसेंबर रोजी चेन्नईत होणार आहे.
गट ड मधील एका सामन्यात स्पेनने नामिबियाचा 13-0 असा धुव्वा उडवित गटात अग्रस्थान मिळविले. ब्रुनो अॅव्हिलाने हॅट्ट्रिकसह चार, आंद्रेस मेदिना व जोसेप मार्टिन यांनी प्रत्येकी दोन तर अल्बर्ट सेराहिमा, निकोलस मुस्तारोस, टोन मोरान, अॅलेक्स बोझल व पेअर अमात यांनी प्रत्येकी एक गोल केला. याच गटातील आणखी एका सामन्यात बेल्जियमने इजिप्तचा 10-0 असा फडशा पाडत गटात दुसरे स्थान मिळविले. मॅक्सिमिलियन लँगरने हॅट्ट्रिक तर लुकाश बाल्थाझरने दोन, बेंजामिन थिएरी, मथायस फ्रँकोइस, जीन क्लोएटेन्स, ह्युगो लाबुशेअर, मारिन व्हान हील यांनी एकेक गोल नोंदवले.
गट ई मधून नेदरलँड्सने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना ऑस्ट्रियाचा 11-0 असा धुव्वा उडवला. कॅस्पर व्हान डर व्हीनने हॅट्ट्रिक, फिन व्हान बिजनेनने 2, कॅस्पर हाफकॅम्प, जोप वोल्बर्ट, थिएस बाकर, जेन्स डी वुइस्ट, पेपिन व्हान डर व्हॉक, जॅन व्हान्ट लँड यांनी एकेक गोल केले. याच गटात इंग्लंडने मलेशियावर 3-1 असा विजय मिळविला. मात्र त्यांना उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. हेन्री मारखम, मायकेल रॉयडन, अॅलेक्स चिहोटा यांनी इंग्लंडचे गोल केले तर मलेशियाचा एकमेव गोल अझिमुद्दिन कमरुद्दिनने नोंदवला.