भारत- दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना आज
वृत्तसंस्था/ रायपूर
ड्रेसिंग रूममधील वातावरणाविषयी वादग्रस्त चर्चा असूनही आज बुधवारी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या दृष्टीने भारताला विराट कोहलीच्या जबरदस्त फॉर्मवर आणि रोहित शर्मावर अवलंबून राहावे लागेल.
रांची येथे झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीचे विक्रमी 52 वे एकदिवसीय शतक आणि रोहितच्या जलद 57 धावांमुळे भारताच्या 17 धावांनी विजयाचा मार्ग मोकळा झाला. तिथे भारताच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेकडून जोरदार प्रत्युत्तर सहन करावे लागले, पण त्यांना रोखण्यात गोलंदाजानी शेवटी यश मिळवले. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाला दोन वर्षे बाकी असताना कोहली आणि रोहित केवळ त्यांची तंदुऊस्ती आणि फॉर्म सिद्ध करण्यासाठी प्रत्येक सामन्यातील परीक्षेला तोंड देत नाहीत, तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी वाढत्या मतभेदांनाही तोंड देत आहेत.
मैदानाबाहेरील चर्चेत हा मुद्दा वर्चस्व गाजवत आहे आणि कधी तरी बीसीसीआय हस्तक्षेप करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतास सलग दोन विजय मिळवून दिल्यानंतर (ऑक्टोबरमध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियावर नऊ गड्यांनी विजय) कोहली आणि रोहित यांनी दाखवून दिले आहे की, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी ते शक्य तितके प्रयत्न करतील.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि गंभीर हे दोघेही विश्वचषकातील त्यांच्या सहभागाबाबत पक्के दिसलेले नाहीत आणि कदाचित हाच दोन्ही बाजूंमधील तणावाचा केंद्रबिंदू आहे. तथापि, सलामीच्या विजयानंतरही भारताला काळजी करण्यासारखे बरेच काही आहे. पहिली गोष्ट म्हणजे संघरचना पूर्णपणे जाग्यावर पडलेली दिसत नाही. ‘अ’ श्रेणी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या ऋतुराज गायकवाडला सलामीवीरापासून चौथ्या क्रमांकावर ढकलण्यात आले आहे. तो या भूमिकेसाठी पूर्णपणे तयार दिसलेला नाही, तर प्रभारी कर्णधार के. एल. राहुलने आपल्या सहाव्या क्रमांकाला न्याय दिलेला आहे.
वॉशिंग्टन सुंदर अशा प्रयोगांसाठी नवीन नाही. कारण दक्षिण आफ्रिकेविऊद्ध कोलकाता कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या तमिळनाडूच्या या अष्टपैलू खेळाडूने त्याच्या फलंदाजीच्या स्थानांमध्ये बरेच बदल पाहिले आहेत. पण पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाचव्या क्रमांकावर खेळण्यास आलेला सुंदर देखील भारताच्या धावसंख्येची गती मंदावल्यावेळी बाद झालेल्या फलंदाजांपैकी एक होता. अष्टपैलू खेळाडू म्हणूनही वॉशिंग्टनला गोलंदाजीच्या बाबतीत फारशी चमक दाखविता आली नाही. कारण त्याने 18 धावा देताना फक्त तीन षटके टाकली. हर्षित राणाने नवीन चेंडूवर सुऊवातीला दोन बळी घेऊन चांगली छाप पाडली. परंतु नंतर त्याच्या गोलंदाजीवर बऱ्याच धावा निघत असल्याने या अष्टपैलू खेळाडूला आपल्या माऱ्यावर अधिक नियंत्रण आणावे लागेल. विशेषत: 34 व्या षटकानंतर फक्त एक चेंडू वापरण्याची परवानगी असते, तेव्हा त्याला अधिक नियंत्रित मारा करावा लागेल.
आयसीसीचा नवीन नियम 34 ते 50 षटकांपर्यंत दोन चेंडूंपैकी फक्त एक चेंडू वापरण्याची परवानगी देतो. कुलदीप यादवने 68 धावांत चार जणांना बाद करताना महत्त्वाचे बळी घेतले आणि तो थोडा महागडा ठरला असला, तरी त्याच्या विविधांगी माऱ्याने फरक घडवून आणला. दक्षिण आफ्रिका लक्ष्य गाठू शकला नाही, पण त्याचे प्रयत्न फार मोठ्या फरकाने कमी पडले नाहीत. एका टप्प्यावर 3 बाद 11 अशी स्थिती झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रेरणादायी पुनरागमन केले. पाटा खेळपट्टीवर मार्को जॅनसेनने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना चिरडून टाकले आणि 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करण्याबरोबर 39 चेंडूंत 70 धावांची खेळी केली. मॅथ्यू ब्रीट्झकेनेही भारताविऊद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 72 धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेची धोकादायक कॉर्बिन बॉशचा समावेश असलेली खालची फळी सामना हिरावून नेते की काय असे एक वेळ वाटत होते. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा आणि केशव महाराज यांच्याशिवाय खेळणे पसंत केले. त्यांना त्यांच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेतील विजयानंतर विश्रांती देण्यात आली होती. परंतु दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या पुनरागमनाने संघ मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
गुवाहाटीत यजमान संघाला खेळपट्टी आणि परिस्थितीचा फारसा परिचय नव्हता. छत्तीसगडच्या राजधानीत असलेला शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम देखील तुलनेने अपरिचित आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात भारताने जानेवारी, 2023 मध्ये न्यूझीलंडचा सहज पराभव केला होता त्यावेळी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी किवी संघाला फक्त 108 धावांवर बाद केले होत आणि यजमान संघाने जवळजवळ 30 षटके शिल्लक असताना आठ गड्यांनी विजय मिळवला होता. डिसेंबर, 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध येथे खेळलेला एकमेव टी-20 सामना देखील खूप मोठ्या धावसंख्येचा नव्हता आणि भारताने 9 बाद 174 धावा करून 20 धावांनी तो जिंकला होता.
संघ : भारत : के. एल. राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, विराट कोहली, रिषभ पंत, रोहित शर्मा, तिलक वर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रे•ाr, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार). मॅथ्यू ब्रीट्झके, डेवाल्ड ब्रेव्हिस क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, ऊबिन हरमन, एडन मार्करम, रायन रिकेल्टन, कॉर्बिन बॉश, मार्को जॅनसेन, प्रिनेलन सुब्रायन, ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, केशव महाराज, लुंगी एनगिडी.
सामन्याची वेळ : दुपारी 1:30 वा.