भारत-सिंगापूर मैत्री अधिक घट्ट
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल : वित्त आणि उत्पादन क्षेत्राशी संबंधित करार होणार
वृत्तसंस्था/ सिंगापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार 4 सप्टेंबर रोजी सिंगापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाले. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी येथे पोहोचले असून दक्षिण-पूर्व आशियाई देशाची त्यांची पाचवी अधिकृत भेट आहे. ब्रुनेईचा अधिकृत दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी सिंगापूरला पोहोचले. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेणार आहेत. यासोबतच ते राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम, वरिष्ठ मंत्री आणि माजी पंतप्रधान ली सिएन लूंग आणि एमेरिटस वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांचीही भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींचा सिंगापूर दौरा खूप खास असून या दौऱ्यात अनेक वित्त आणि उत्पादन क्षेत्राशी संबंधित करारांना मूर्त स्वरुप मिळणार आहे.
सिंगापूर आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंध दृढ होत चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे हे द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट होतील, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सिंगापूरमध्ये दाखल झालेल्या मोदींचे गृहमंत्री आणि कायदामंत्री के. षणमुगम यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींसोबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत.
सिंगापूर शहरात पोहोचलेल्या मोदींचे भारतीय समुदायाच्या लोकांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी ढोलही वाजवला. मोदींचे स्वागत करण्यासाठी आलेले कलाकार ढोल-ताशांच्या तालावर नाचताना दिसले. भारतीय नागरिकांनी पंतप्रधानांना भगव्या रंगाची शालही भेट दिली. सिंगापूरमधील हॉटेलच्या बाहेर भारतीय समुदायाचे लोकही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. लोकांनी मोदींसोबत सेल्फीही काढले. तसेच एका महिलेने त्यांना राखीही बांधली.
आशियातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र असलेला सिंगापूर हा देश भारताचा सहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताच्या एकूण व्यापारात त्याचा वाटा 3.2 टक्के आहे. सिंगापूर हा भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत आहे. सिंगापूर हा व्यापारासाठी एक महत्त्वाचा द्विपक्षीय भागीदार तर आहेच, पण भारतासाठी आशिया-पॅसिफिक आणि दक्षिण-पूर्व आशियाचे प्रवेशद्वार म्हणूनही काम केले आहे.
भारत-ब्रुनेई थेट विमानसेवा सुरू होणार
पंतप्रधान नरेंद्र यांच्या ब्रुनेई दौऱ्यादरम्यान ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान आणि भारतातील चेन्नई दरम्यान थेट हवाई सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. थेट हवाई सेवेव्यतिरिक्त, दोन्ही देशांनी संरक्षण, अंतराळ आणि इतर क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांमुळे भविष्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे. भारत आणि ब्रुनेई यांनी उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि दूरसंचार केंद्रांच्या निर्मितीमध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांची बुधवारी द्विपक्षीय बैठक झाली. या भेटीत द्विपक्षीय संबंधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. बंदर सेरी बेगवान आणि चेन्नई दरम्यान थेट हवाई सेवा सुरू झाल्याचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर आणि ब्रुनेईचे परिवहन आणि माहिती संप्रेषण मंत्री महामहिम पेंगिरन दातो शामहारी यांनी उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि दूरसंचार सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि ब्रुनेईचे सुलतानही उपस्थित होते. चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी दोन्ही सरकारांमधील सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत दीर्घकालीन व्यवस्थेचे कौतुक करत परस्पर हिताच्या क्षेत्रात भविष्यकालीन सहकार्यासाठी नवीन सामंजस्य कराराचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, अन्न सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य, क्षमता निर्माण आणि संस्कृती तसेच लोक ते लोक देवाणघेवाण यासह विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली.
हवामान बदल, दहशतवादावरही चर्चा
पंतप्रधान मोदी आणि ब्रुनेईच्या सुलतान यांनी पॅरिस करारासारख्या आंतरराष्ट्रीय हवामान उद्दिष्टांनुसार हवामान बदलास संबोधित करण्याच्या तातडीच्या गरजेवर सहमती दर्शविली. तसेच या वाढत्या आव्हानाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यांनी आयसीटी, फिनटेक, सायबर सुरक्षा, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य शोधण्यास आणि पाठपुरावा करण्यास सहमती दर्शविली. दोघांनीही प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा केली.