भारत-सिंगापूर फुटबॉल लढत आज गोव्यात
वृत्तसंस्था / मडगाव (गोवा)
2027 च्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र फेरीतील यजमान भारत आणि सिंगापूर यांच्यातील परतीचा फुटबॉल सामना येथील फातोर्डा स्टेडियमवर मंगळवारी होत आहे.
या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाला पात्रतेची संधी खूपच कमी आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताने केवळ एकमेव सामना जिंकला आहे. मंगळवारी होणाऱ्या सामन्यासाठी मोहन बागान संघातील बचावफळीत खेळणारा सुभाशिष बोस तसेच मध्यफळीतील राल्ते यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक खालीद जमील यांनी सांगितले. दरम्यान भारतीय फुटबॉल संघातील महत्त्वाचा खेळाडू संदेश झिंगन याला एक सामन्यासाठी निलंबीत केल्याने तो मंगळवारच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
या पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारताचा क गटात समावेश आहे. 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने सिंगापूरला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. या सामन्यात भारताला शेवटच्या काही कालावधीत 10 खेळाडूनिशी खेळावे लागले होते. या सामन्यानंतर भारतीय फुटबॉल संघ क गटात तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. त्यांनी तीन सामन्यातून केवळ 2 गुण मिळविले आहेत. या गटात हाँगकाँग, चीन हे सात गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. सिंगापूरने 5 गुण मिळविले आहेत. तर बांगलादेश या गटात केवळ एका गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.