भारत-सिंगापूर फुटबॉल लढत बरोबरीत
वृत्तसंस्था/सिंगापूर
भारतीय फुटबॉल संघाने एएफसी आशियाई चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान अद्याप जिवंत ठेवताना सिंगापूरला 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात खेळाच्या पूर्वार्धात सिंगापूरचे खाते इकसान फंडीने उघडले. फंडीने हा गोल पहिल्या सत्रातील स्टॉपेज कालावधीत नोंदविला. मध्यंतरापर्यंत सिंगापूरने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. क गटातील या सामन्यात 90 व्या मिनिटाला रहीम अलीने शानदार गोल करुन भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या सामन्यात भारतीय संघाला खेळाच्या उत्तरार्धात 10 खेळाडूनिशी खेळावे लागले. कारण भारतीय संघातील संदेश झिंगन याला पंचांनी दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. भारताने या स्पर्धेत आता तीन सामन्यांतून दोन गुण मिळविले आहेत. भारतीय फुटबॉल संघाने यापूर्वी बांगलादेशला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. तर हाँगकाँगने भारताचा 1-0 असा पराभव केला होता. सिंगापूरचा संघ गुणतक्त्यात 5 गुणांसह आघाडीवर आहे. आता भारताचा हाँगकाँगबरोबरचा परतीचा सामना 14 ऑक्टोबरला मडगाव-गोवा येथे खेळविला जाणार आहे.