भारताने मालदीवमधून सैन्यमाघार घ्यावी!
चीनच्या दौऱ्यावरून परतताच मालदीव राष्ट्राध्यक्ष आक्रमक : 15 मार्चपर्यंतची मुदत : द्विपक्षीय तणाव चिघळण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मोले
मालदीव सरकारने भारताला 15 मार्चपर्यंत आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी आक्रमक धोरण दाखवले आहे. मुइझ्झू यांनी शनिवारीच मालदीवला धमकी देण्याचा अधिकार कोणत्याही देशाला नसल्याचे वक्तव्य भारताचे नाव न घेता केले होते. त्यापाठोपाठ आता त्यांनी मालदीवमध्ये तैनात केलेल्या लष्करी जवानांना दोन महिन्यात माघारी बोलावण्याची ‘डेडलाईन’ दिली आहे. यापूर्वीही मुइझ्झू यांनी निवडणूक प्रचारात त्यांनी ‘इंडिया आऊट’चा नारा दिला होता. तसेच मालदीवमध्ये तैनात असलेल्या इतर देशांच्या सैनिकांना हटवण्याची घोषणा केली होती.
राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी भारताला आपले लष्करी जवान 15 मार्चपर्यंत मागे घेण्यास सांगितले आहे. मुइझ्झू यांच्या कार्यालयातील सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी रविवारी यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे भारत आता कोणता पवित्रा घेतो हे पहावे लागणार आहे. मालदीव राष्ट्राध्यक्षांच्या इशाऱ्यानुसार आता भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये राहू शकत नाहीत. चीन समर्थक नेता मानल्या जाणाऱ्या मुइझ्झू यांनी गेल्यावषी 17 नोव्हेंबर रोजी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच भारताला आपले लष्करी जवान मागे घेण्याची औपचारिक विनंती केली होती.
पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरून मुइझ्झू शनिवारी मायदेशी परतले. मालदीवमध्ये पोहोचताच त्यांनी ‘आमचा देश छोटा असला तरी आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना कोणाला नाही’ असे वक्तव्य केले होते. मुइझ्झू यांनी कोणाचेही नाव घेऊन थेट हे वक्तव्य केलेले नाही. मात्र त्यांचे लक्ष्य भारताकडे असल्याचे मानले जात आहे.
भारतीय उच्चायुक्तांच्या उपस्थितीत पहिली बैठक
मालदीव आणि भारताने सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय कोअर ग्रुप तयार केला आहे. रविवारी सकाळी माले येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात त्याची पहिली बैठक झाली. या बैठकीला भारतीय उच्चायुक्त मुनू महावरही उपस्थित होते. अध्यक्ष मुइझ्झू यांच्या कार्यालयातील सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनीही बैठकीला दुजोरा दिला. 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्याची विनंती हा बैठकीचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारने अद्याप या मीडिया वृत्ताला दुजोरा दिलेला नाही किंवा संपूर्ण घटनेवर कोणतेही भाष्य केलेले नाही.
मालदीवमध्ये सध्या 88 भारतीय सैनिक
मालदीवमध्ये भारतीय लष्कराची छोटी तुकडी तैनात आहे. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार मालदीवमध्ये 88 भारतीय जवान तैनात आहेत. मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीवरून भारत सरकारने तेथे आपले सैन्य तैनात केले होते. सागरी सुरक्षा आणि आपत्ती निवारण कार्यात मदत करण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी मालदीवमध्ये तैनात करण्यात आली आहे. 2013 पासून लामू आणि अ•t बेटांवर भारतीय सैनिक तैनात आहेत. मालदीवमध्ये भारतीय नौसैनिकही तैनात आहेत. भारतीय नौदलाने तेथे 10 तटीय पाळत ठेवणारे रडार स्थापित केले आहेत.
द्विपक्षीय संबंध ताणणार
मुइझ्झू यांची चीनशी वाढलेली जवळीक आणि भारताबाबतच्या कठोर वृत्तीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्मयता आहे. अलीकडेच त्यांच्या सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या मालदीववर बहिष्कार टाकण्यासाठी भारतीय नेटिझन्स एकत्र येताना दिसले. मालदीवमध्ये जाण्यापेक्षा भारतातील लक्षद्वीपला जाणे चांगले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला सुऊवात झाली.