भारताचा इराणला धक्का, आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारतीय फुटबॉल संघाने येथे झालेल्या शेवटच्या गट ‘ड’ पात्रता सामन्यात जबरदस्त पसंतीच्या इराणला 2-1 ने पराभूत करून उल्लेखनीय पुनरागमन केले आणि 2026 च्या एएफसी 17 वर्षांखालील आशियाई चषक स्पर्धेत स्थान निश्चित केले.
भारतीय संघाने सामन्यात दीर्घकाळापर्यंत जवळजवळ अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखविली, जी ईकेए अरेना येथे डल्लालमुओन गंगटे (46 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल) आणि गुनलेबा वांगखेरकपम (52 व्या मिनिटाला) यांनी केलेल्या गोलांमुळे घडली. अमीररेझा वलीपूरने 19 व्या मिनिटाला केलेल्या गोलने पाहुण्या संघाला आघाडी मिळवून दिली. पुढील 17 वर्षांखालील आशियाई चषक सौदी अरेबियामध्ये होणार आहे आणि या स्पर्धेत भारताचा हा 10 वा सहभाग असेल.
इराणने सामन्यात प्रवेश केला तेव्हा त्याचे सात गुण झाले होते आणि तो अपराजित होता. प्रगतीसाठी त्याला फक्त एका बरोबरीची आवश्यक होती. चार गुणांसह भारताला मात्र विजयापेक्षा कमी काहीही चालणारे नव्हते आणि जेव्हा वलीपूरने पहिला गोल केला तेव्हा आव्हान आणखी मोठे झाल्यासारखे वाटले. पण या तऊण भारतीय संघाने नमते घेण्यास नकार दिला. प्रथम गंगटेच्या माध्यमातून त्यांनी बरोबरी साधली, जेव्हा या आघाडीपटूने पेनल्टीचे गोलामध्ये रूपांतर केले, त्यानंतर वांगखेरकपमने विजयी गोल केला. या विजयामुळे भारत सात गुणांवर पोहोचून त्याने इराणशी बरोबरी केली. परंतु दोन्ही संघांची तुलना केली असता भारतीय संघ पुढे राहिला आणि आशियाई स्पर्धेसाठीची पात्रता निश्चित करण्यासाठी ते पुरेसे होते.
मध्यांतर होण्यास आलेले असताना डावीकडून आलेल्या एका कॉर्नरने इराणी गोलक्षेत्रात गोंधळ निर्माण केला. यावेळी हीरंगनबा सेरामला खाली पाडण्यात आल्यावर पंचांनी थेट पेनल्टी दिली. यावेळी गंगटेने दबावाखाली थंड डोक्याने गोलरक्षकाला चकविले. मग पुनऊज्जीवित झालेल्या भारताने दुसऱ्या सत्राची सुऊवात नव्या उद्देशाने केली आणि 52 व्या मिनिटाला इराणी चुकीमुळे यजमानांना मोलाची आघाडी मिळाली.