भारताने इंग्लंडला दिले 374 धावांचे लक्ष्य
तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या 1 बाद 50 : विजयासाठी 324 धावांची गरज
वृत्तसंस्था/ लीड्स (लंडन)
केनिंग्टन ओव्हलवर सुरु असलेल्या पाचव्या व शेवटच्या कसोटीत सलामीवीर यशस्वी जैस्वालचे शतक आणि आकाशदीप, रविंद्र जडेजा, वॉशंग्टन सुंदर अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 1 गडी गमावत 50 धावा केल्या होत्या. बेन डकेट 34 धावांवर खेळत होता. इंग्लंडला आता विजयासाठी 324 धावांची तर भारताला 9 विकेट्सची गरज भासणार आहे.
या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी 2 बाद 75 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी जैस्वाल 51 धावांवर तर आकाश दीप 4 धावांवर नाबाद होता. दरम्यान, तिसऱ्या दिवशी या दोघांची जोडी जमली आणि दोघांनी दमदार खेळ करत शतकी भागीदारी केली.
आकाशदीपचे पहिले कसोटी अर्धशतक
यादरम्यान आकाशने आक्रमक खेळताना कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले. आकाशने 72.86 च्या स्ट्राईक रेटने 9 चौकारांसह हे अर्धशतक ठोकलं. आकाशच्या या खेळीनंतर ड्रेसिंग रुममधील भारतीय खेळाडूंनी उभ राहून त्याच्या या खेळीचं कौतुक केलं. इतकंच काय तर कायम गंभीर मुद्रेत असणारे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील आकाशच्या शतकानंतर आनंदी झाले. आकाशचा अडथळा 43 व्या षटकात ओव्हर्टनने दूर केला. त्याने 94 चेंडूत 12 चौकारांसह 66 धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार शुभमन गिलही फार काळ टिकला नाही. 11 धावांवर त्याला अॅटकिन्सनने माघारी धाडले.
जैस्वालचे सहावे कसोटी शतक
करुण नायर शेवटच्या कसोटीतही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. त्याला केवळ 17 धावा करता आल्या. लंचब्रेकनंतर डावखुऱ्या जैस्वालने आपले सहावे कसोटी शतक पूर्ण केले. त्याचे या मालिकेतील दुसरे शतक ठरले. या मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातही त्याने शतक झळकावले होते. दरम्यान, जैस्वालने मोक्याच्या क्षणी संयमी व आक्रमक खेळी साकारताना 164 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारासह 118 धावांची खेळी साकारली. शतकानंतर मात्र त्याला जोश टंगने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. जैस्वाल बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल यांनी चहापानापर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. ंचहापानानंतर जुरेल 34 धावा काढून बाद झाला.
जडेजा, सुंदरची शानदार अर्धशतके
जुरेल बाद झाल्यानंतर मात्र वॉशंग्टन सुंदर आणि जडेजाने आक्रमक खेळ केला. जडेजाने अर्धशतकी खेळी साकारताना 5 चौकारासह 53 धावा फटकावल्या. तर सुंदरने मात्र आक्रमक खेळताना अवघ्या 46 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारासह 53 धावांची खेळी साकारली. या दोघांनी फटकेबाजी केल्यामुळे भारतीय संघाला साडे तीनशेचा टप्पा गाठता आला. ही जोडी बाद झाल्यांतर भारताचा दुसरा डाव 396 धावांत आटोपला अन् इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडकडून जोश टंगने सर्वाधिक 5 बळी घेतले.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडने 1 बाद 50 धावा केल्या आहेत. दिवसातील शेवटच्या षटकात सिराजने जॅक क्रॉलीला 14 धावावर बाद केले. बेन डकेट 34 धावांवर राहिला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 224 आणि दुसरा डाव 88 षटकांत सर्वबाद 396 (यशस्वी जैस्वाल 164 चेंडूत 118, पेएल राहुल 7, साई सुदर्शन 11, आकाशदीप 66, शुभमन गिल 11, करुण नायर 17, रविंद्र जडेजा 53, ध्रुव जुरेल 34, वॉशंग्टन सुदर 53, जोश टंग 5 बळी, अॅटकिन्सन 3 बळी, ओव्हर्टन 2 बळी).
इंग्लंड पहिला डाव 247.
जैस्वाल, जशी सुरुवात तसाच शेवटही
शतकी खेळीसह इंग्लंड दौऱ्याची सुरुवात करणाऱ्या यशस्वी जैस्वालने ओव्हलच्या मैदानातील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातही शतकाला गवसणी घातली आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या भात्यातून निघालेले हे दुसरे आणि कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. यातील चार शतके त्याने इंग्लंडविरुद्ध झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत यशस्वीने टेस्ट क्रिकेटमधील आपले 2000 धावा पूर्ण केल्या, यासोबतच तो भारताकडून सर्वात कमी म्हणजे फक्त 40 डावांत 2000 धावा पूर्ण करणारा सह-विक्रमवीर ठरला. या यादीत त्याच्यासोबत फक्त राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची नावे आहेत.
जैस्वालचे शतकानंतर अनोखे सेलिब्रेशन
शतक साजरे करताना यशस्वीने खास अंदाज दाखवला. शतक पूर्ण झाल्यावर त्याने जोरात उडी घेतली, मग बॅट आणि हेल्मेट खाली ठेवत हातातील ग्लोव्हज काढले आणि फ्लाईंग किस देत सेलिब्रेशन केले. त्यानंतर दोन्ही हातांनी हार्ट तयार करत पुन्हा एकदा फ्लाईंग किस दिला. हे सगळं पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. काहींच्या मते, यावेळी त्याचे कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होते.
आकाशदीपचे पहिले कसोटी अर्धशतक
केनिंग्टन ओव्हल मैदानावर तिसऱ्या दिवशी एक मोठा थरार पाहायला मिळाला. भारतासाठी नाईट वॉचमन म्हणून मैदानात उतरलेल्या आकाश दीपने इंग्लंडच्या रणनीती अक्षरश: पाण्यात घालवली. कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच अर्धशतक झळकावत त्याने धडाकेबाज फलंदाजी करत इंग्लंडला आश्चर्यचकित केले. इंग्लिश गोलंदाजांसमोर संयमी आणि आत्मविश्वाससपूर्ण खेळी करत आकाश दीपने 70 चेंडूत अर्धशतक पुर्ण केले. त्याने यशस्वी जैस्वालसोबत 80 धावांहून अधिक महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत नेले.